Advertisement

सभागृहनेते यशवंत जाधव यांना स्थायी समिती अध्यक्षपदाचे डोहाळे

मुंबई महापालिकेचे सभागृह नेते यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यांच्या या पवित्र्याने पुन्हा एकदा मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांना स्थायी समितीपद हुलकावणी देणार असल्याचं दिसत आहे.

सभागृहनेते यशवंत जाधव यांना स्थायी समिती अध्यक्षपदाचे डोहाळे
SHARES

मुंबई महापालिकेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांना सध्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे डोहाळे लागले असून कधी एकदा मार्च महिना उजाडतोय आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या खुर्चीत जाऊन बसतोय, असं त्यांना झालं आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदी बसल्यानंतर सुरळीत कामकाज करता यावं म्हणून यशवंत जाधव यांनी आपल्या मेव्हण्यासह दोघांना आतापासून स्थायी समितीचा अभ्यास करण्यासाठी समिती अध्यक्षांच्या कार्यालायत जागा करून दिली आहे. यशवंत जाधव हे सध्या मुलाच्या लगीनघाईत असले, तरी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यांच्या या पवित्र्याने पुन्हा एकदा मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांना स्थायी समितीपद हुलकावणी देणार असल्याचं दिसत आहे.


नोटाबंदी, जीएसटीमुळे

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची कामगिरी समाधानकारक होत नसून सभागृह नेतेपदाऐवजी स्थायी समिती अध्यक्षपदी विराजमान होऊन प्रशासनावर अंकुश ठेवेन असा निर्धार करत यशवंत जाधव हे पदावर बसण्यास तयार झाले आहेत. विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर या पदाला न्याय देऊ शकलेले नाहीत. नोटाबंदी, जकात रद्द करून लागू केलेला जीएसटी यामुळे स्थायी समिती अध्यक्षांना काम करण्याची संधीच मिळालेली नाही. मात्र, या डिसेंबरपासून गाडी रुळावर येणार आहे. पण या काळात एक अध्यक्ष म्हणून कोरगावकर प्रशासनावर आपली पकड ठेऊन विकासकामे पुढे रेटू शकलेले नाहीत.


दुसऱ्यांदा संधी नाही

या अपयशाचं खापर त्यांच्या माथी फोडून कोरगावकर यांना दुसऱ्यांदा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे या संधीचा लाभ उठवत स्थायी समिती अध्यक्ष पदावर आतापासूनच यशवंत जाधव यांनी दावा ठोकला आहे. विशेष म्हणजे जाधव उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या विश्वासातील असून त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचं आश्वासन दिल्यामुळे जाधव यांनी या समितीचा कारभार हाती घेण्याच्या हालचाली केल्याचं समजत आहे.


महापौर वगळता सर्व मुठीत

सभागृह नेत्यांनी महापौरांसह सर्व समिती अध्यक्षांना आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. पण महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांना जुमानलेलं नाही. त्यामुळे जाधव यांनी स्थायी समिती अध्यक्षांचा कारभाराच आपल्या हाती घेतला आहे. त्यामुळे खुद्द रमेश कोरगावकर हे जाधव यांच्या मनमानीला कंटाळले आहेत. मात्र, जाधव यांना बोलण्याचं धाडस नसल्याने पक्षाच्या इज्जतीकरीता ते मूग गिळून आहेत. मात्र, सुधार समिती अध्यक्षांसह इतर समिती अध्यक्ष हे जाधव यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. पण जाधव यांच्या या हस्तक्षेपाबद्दल खासगीत चीड आणि नाराजी व्यक्त करताना अध्यक्ष दिसत आहेत.


नगरसेवकही सभागृहनेत्यांवर नाराज

महापालिका सभागृह नेते यशवंत जाधव यांच्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक प्रचंड नाराज आहेत. महापालिका सभागृहात एखाद्या विषयावर बोलण्याची तीव्र इच्छा असूनही सभागृह नेते हस्तक्षेप करत आम्हाला बोलायला देत नसल्याची खंत सेनेच्या नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे. आम्ही नव्याने निवडून आलो आहोत, विभागातील लोकांच्या समस्या आम्हाला मांडू दिल्या जात नाहीत. नवीन नगरसेवकांवर सभागृह नेत्यांचा विश्वास नाही, पण जुन्याही नगरसेवकांना सभागृहात बोलण्यास दिलं जात नाही. त्यामुळे महत्त्वाच्या विषयावर सेनेचे नगरसेवक बोलताना दिसत नाहीत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा