गुड न्यूज! 1 सप्टेंबरपासून मोनो पुन्हा ट्रॅकवर

नऊ महिन्यांपूर्वी आग लागल्यानं पूर्णपणे ठप्प झालेली चेंबूर ते वडाळा मोनोरेल सेवा अखेर आता पुन्हा पूर्ववत होणार आहे. नऊ महिन्यांपासून यार्डात असलेल्या मोनो गाड्या 1 सप्टेंबरपासून पुन्हा ट्रॅकवर येणार आहेत.

गेल्या दोन तीन महिन्यांपासून मोनो सुरू होणार अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात मोनो सुरू होण्याची प्रतीक्षा वाढली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकण (एमएमआरडीए) कडून 1 सप्टेंबरचा मुहूर्त शोधण्यात आला आहे. दरम्यान 1 सप्टेंबरला मोनो सुरू करायची असल्यानं सध्या मोनोच्या चाचण्या अर्थात ट्रायल रन जोरात सुरू आहेत.

तोटा वाढला

चेंबूर ते वडाळा मार्गावरील मोनोच्या डब्याला नऊ महिन्यांपूर्वी सकाळच्या वेळीस आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण मोनोचे दोन डबे जळून खाक झाले होते. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मोनोच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला. एमएमआरडीएवर मोठी टीका यानिमित्तान होऊ लागली. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आधीच दिवसाला 7 ते 8 लाखांचा तोटा सहन करणाऱ्या मोनोचा तोटा आणखी वाढत गेला.

आधीपेक्षा अधिक सुरक्षित?

यासर्व पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीन सर्व उपाययोजना करत मोनो पुन्हा सेवेत आणण्यात येत आहे. चेंबूर ते वडाळा मार्गावर धावणारी मोनो आधीपेक्षा अधिक सुरक्षित असेल, असा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. हा दावा कितपत खरा आहे? हे येणारा काळच ठरवेल. पण मोनो पुन्हा ट्रॅकवर येणार ही मोनो प्रवाशांसाठी दिलासादायक बाब आहे हे नक्की!

मुंबईकर प्रतीक्षेत

चेंबूर ते वडाळा मोनो ट्रॅकवर येणार असली तरी वडाळा ते जेकब सर्कल या दुसऱ्या टप्प्याची मात्र प्रतीक्षा काही संपलेली नाही. या मार्गचं बांधकाम पूर्ण झालं असलं तरी यातील आर्थिक आणि तांत्रिक अडचणी दूर होत नसल्यानं या मार्गाची प्रतीक्षा मुंबईकरांना करावी लागत आहे.


हेही वाचा -

मोनोमागचं शुक्लकाष्ठ संपेना, कंत्राटदारांची पाचपट जादा दराची मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या