स्थानकात रूग्णवाहिका नसल्याने गेला एकाचा जीव

एकीकडे अंधेरी स्थानकात डोक्यावर स्लॅब कोसळून वृद्ध महिला जखमी झाली असतानाच दुसरीकडे लोकमान्य टिळक टर्मिनसवर केवळ रूग्णवाहिका स्थानकात नसल्यामुळे एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नक्की झालं काय?

गोरखपूरला जाण्यासाठी निघालेले अब्दुल गनी अन्सारी हे लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये रांगेत उभे होते. अचानक त्यांना उलटीचा त्रास होऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले. पण, एलटीटी स्थानकाजवळ 108 रुग्णवाहिका नसल्याकारणाने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी उशीर झाला.

अखेर, जीआरपी पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात रुग्णवाहिकेची मागणी केली. बेशुद्धवस्थेतच अब्दुल यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, त्यांच्यावर उपचार होण्याआधीच त्यांचा जीव गेल्याचं सांगण्यात आलं.

तक्रारींकडे दुर्लक्ष

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अजय बोस यांनी मात्र आपण याबाबत केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा दावा केला आहे.

4 नोव्हेंबरला एलटीटीमधून 108 रुग्णवाहिकेची सेवा नसल्याबाबत मी सर्व संबंधितांकडे तक्रार केली होती. पण, तक्रारीची नोंद न घेता त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं.

अजय बोस, सामाजिक कार्यकर्ते

'आम्ही तात्काळ रूग्णवाहिका पाठवली'

दरम्यान, 108 रुग्णवाहिकेचे सीईओ ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितलं की, ‘आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही तत्काळ त्याठिकाणी रुग्णवाहिका पाठवली. पण, त्यानंतर लगेचच दुसरा कॉल आला. तेव्हा सांगण्यात आलं की खासगी रुग्णवाहिका मागवण्यात आली आहे. त्यामुळे आता रुग्णवाहिकेची गरज नाही.’

मध्य रेल्वेही बचावात्मक पावित्र्यात

तर, जिथे जास्त गर्दी होण्याची शक्यता असते किंवा जिथे गुदमरण्याची शक्यता असते, त्या ठिकाणी रुग्णवाहिकेची सेवा देण्यात आली आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला कॉल येतो, तेव्हा तिथे तात्काळ रुग्णवाहिका पाठवून त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. असा कुणाचा मृत्यू होणं ही दुर्दैवी घटना आहे, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा

रेल्वे अपघातांना तारांचं 'कुंपण'!

पुढील बातमी
इतर बातम्या