४० कोटी प्रवाशांची 'मेट्रो सफर'

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • परिवहन

थंडा-थंडा कूल-कूल आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणारी मुंबईतील पहिली-वहिली वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-१ सुरूवातीपासूनच मुंबईकरांच्या पसंतीस उतरली. त्यामुळेच मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून आतापर्यंत १४२३ दिवसांत ४० कोटी प्रवाशांनी मेट्रो सफर केली आहे.

मोनो तोट्यात

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)च्या माध्यामतून अत्याधुनिक वाहतूक सेवेचे मेट्रो आणि मोनो असे दोन पर्याय काही वर्षांपूर्वी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले. लोकलमधील गर्दीला आणि धकाधकीच्या प्रवासाला कंटाळलेल्या मुंबईकरांनी मेट्रोला चांगलीच पसंती दिली. मात्र त्याचवेळी मोनोरेल म्हणावी तशी मुंबईकरांच्या पसंतीस उतरली नाही. त्यामुळेच मोनो तोट्यात असून आता तर गेल्या ६-७ महिन्यांपासून मोनोसेवा बंदच आहे. एकूणच मोनो प्रकल्प एकार्थानं फेल ठरला असताना मेट्रो प्रवाशांची संख्या मात्र वाढतीच आहे.

'अशी' आहे आकडेवारी

मेट्रो सुरू झाल्यापासून ३९८ दिवसांत मेट्रो-१ ने १० कोटीच्या प्रवाशी संख्येचा आकडा पार केला होता. आता मेट्रो प्रवासी संख्येचा हा आकडा एकूण १४२३ दिवसांत ४० कोटींवर गेला आहे. पहिल्या १० कोटींचा आकडा ३९८ दिवसांत पार करणाऱ्या मेट्रोने दुसरा १० कोटींचा आकडा ३८८ दिवसांत, तिसरा आकडा ३३७ दिवसांत तर चौथा १० कोटींचा आकडा कवेळ ३०० दिवसांत पार केला. चौथा १० कोटींचा टप्पा केवळ ३०० दिवसांत पार केल्यानं मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)नं समाधान व्यक्त केलं आहे.

प्रवाशांची वाढ कुठे?

मेट्रोच्या पश्चिम द्रुतगती मार्ग आणि आझादनगर मेट्रो स्थानकांवरील प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाल्याचं यानिमित्तानं समोर आलं आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील मेट्रो प्रवाशांची संख्या वर्षभरात ४८ टक्क्यांनी, तर आझादनगर मेट्रो स्थानकावरील प्रवाशांची संख्या ४५ टक्क्यांनी वाढली आहे.


हेही वाचा-

स्टेशनबाहेर अवतरली मेट्रो!

मेट्रो २ ब आणि मेट्रो ४ साठी कंत्राटदारांची नियुक्ती, लवकरच कामाला सुरुवात


पुढील बातमी
इतर बातम्या