घरी चोरी झाल्यावरही 'तेजस' च्या प्रवाशांना भरपाई

तेजस एक्स्प्रेस अहमदाबाद-मुंबई या मार्गावर १७ जानेवारीपासून धावणार आहे. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खास सोयी-सुविधा मिळणार आहेत. तेजस एक्स्प्रेसने प्रवास करताना प्रवाशाच्या घरी चोरी झाल्यास प्रवाशाला एक लाख रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई मिळणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरटीसी) प्रवाशांसाठी  विमा संरक्षणाचीही तरतूद केली आहे.

तेजस एक्स्प्रेसला उशिर झाल्यास प्रवाशांना भरपाई देण्याचा निर्णय याआधीच आयआरसीटीसीने घेतला आहे. यापाठोपाठ आता प्रवासात असताना प्रवाशाच्या घरी चोरी झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्याचाही निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. तेजस एक्स्प्रेसचं तिकीट बुक केल्यानंतर प्रवाशाला विमा कंपनीकडून एक मेल येईल. यामध्ये प्रवासादरम्यानचे सर्व नियम आणि अटी सांगितलेल्या असतील. जर प्रवाशाच्या घरी प्रवास करताना चोरी झाल्यास विमा कंपनी त्याची भरपाई करेल. यासाठी प्रवाशाला विमा कंपनीला एफआयआरची एक प्रत द्यावी लागेल. त्यानंतर विमा कंपनी चौकशी करेल.  चौकशी झाल्यानंतर नुकसान भरपाई प्रवाशाला मिळेल.

१७ जानेवारीला तेजस एक्सप्रेस आपला पहिला प्रवास सुरू करेल. ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकातून दुपारी ३.४० वाजता सुटणार आहे.  तेजस एक्स्प्रेसला जर एक तास उशिर झाला, तर प्रवाशांना १०० रुपये भरपाई मिळेल, तसेच जर दोन तास उशिर झाला तर प्रवाशांना २५०  रुपये भरपाई मिळेल. तेजस एक्स्प्रेसमध्ये एकूण 758 जागा आहेत. यापैकी 56 जागा या एग्झिक्युटीव्ह क्लाससाठी आरक्षित असतील, तर इतर जागा एसी चेअर क्लास असतील. या गाडीतील प्रवाशांचा 25 लाख रुपयांचा प्रवासी विमाही काढला जाईल.


हेही वाचा -

भाऊचा धक्का ते मांडवा प्रवास केवळ ४५ मिनिटांत

ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी प्रवास महाग


पुढील बातमी
इतर बातम्या