Advertisement

Movie Review : राजा घडवणाऱ्या गणितातील सुपरहिरोची 'सुपर' कहाणी

शिक्षण घेण्याचं स्वप्नही पाहू न शकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीसारख्या संस्थेत प्रवेश मिळाला. दिग्दर्शक विकास बहलनं राजा घडवणाऱ्या गणितातील याच सुपरहिरोची मांडलेली 'सुपर' कहाणी म्हणजेच 'सुपर ३०'.

Movie Review : राजा घडवणाऱ्या गणितातील सुपरहिरोची 'सुपर' कहाणी
SHARES

राजाचा मुलगाच राजा बनू शकतो. इतरांनी केवळ वडीलोपार्जित कार्य पुढे सुरू ठेवण्याची प्रथा फार पूर्वीपासून सुरू आहे. या विचारसरणीला छेद देत जो हक्कदार आहे त्यालाही राजा बनण्याचा अधिकार असल्याचा क्रांतीकारक विचार अत्यंत गरीबीत वाढलेल्या आनंद कुमार यांनी मांडला. पुढे हाच विचार त्यांचं ध्येय बनला आणि त्या ध्येयाचं फलित म्हणजे शिक्षण घेण्याचं स्वप्नही पाहू न शकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीसारख्या संस्थेत प्रवेश मिळाला. दिग्दर्शक विकास बहलनं राजा घडवणाऱ्या गणितातील याच सुपरहिरोची मांडलेली 'सुपर' कहाणी म्हणजेच 'सुपर ३०'.

बिहारमधील पटणामध्ये राहणाऱ्या गणितातील खऱ्याखुऱ्या जादुगाराची ही कथा आहे. या जादुगारानं शिकवलेल्या अत्यंत गरीब मुलांनी इंडीयन इन्स्टीट्यूट आॅफ टेक्नॅालॅाजी म्हणजेच आयआयटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करत आपली स्वप्न साकार करत थेट विदेशाच्या दिशेनं उड्डाण केलं. स्वत:ला आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये न जाता आल्याची खंत मनात न बाळगता भावी पिढीसाठी विदेशातील विद्यापीठांची दारं खुली करणाऱ्या अवलियाची ही गोष्ट प्रेरणादायी तर आहेच, परंतु आज मांडलेल्या शिक्षणारूपी बाजारात ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घावणारी आहे.

फुग्गा सिंग नावाचा तरुण लंडनमधील एका समारंभात चक्क हिंदीत भाषण देऊ लागतो. इंग्रजी बोलता येत असूनही आपण तिथपर्यंत कसे आलो हे हिंदीत सांगताना तो आपल्या गुरूंची म्हणजेच आनंद कुमार (ऋतिक रोशन)यांची कथा सांगतो. अत्यंत हुषार असलेल्या आनंदला गणिताचं फार वेड असतं. या वेडापायी फॅारेन जरनलमधील प्रॅाब्लेम सॅाल्व्ह करणासाठी तो एका कॅालेजमध्ये पोहोचतो. हे शिक्षण घेण्याची तुझी पात्रता नसल्याचं सांगत त्याला हाकलून दिलं जातं. तिथला शिपाई त्याची शिक्षणाबाबतची तळमळ ओळखतो आणि या जरनलमध्ये तुझं आर्टिकल आलं तर आयुष्यभर घरी हे फुकटमध्ये येईल असं सांगतो. मग आनंद एक प्रॅाब्लेम सॅाल्व्ह करून लंडनला पाठवतो. त्यानंतर केवळ त्याचं आर्टिकल जरनलमध्ये छापून येत नाही, तर त्याला आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून बोलावणंही येतं, पण पैसे नसल्यानं त्याची संधी हुकते.

पुढे त्याच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होते. घरोघरी जाऊन पापड विकावे लागतात. पुढे एका कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्याची संधी मिळते, पण अचानक आपण हे काय करतो आहोत? हा विचार मनात आल्यावर तो भानावर येतो. सर्व विकून गरीब मुलांना मोफत शिकवण्यासाठी पुढे सरसावतो. त्यामुळं त्याची प्रेयेसी रितू (मृणाल ठाकूर)रागावते, तिचं लग्न होतं. या सर्वांतून बहेर पडत आनंद कुमार यांनी गाठलेल्या ध्येयाची कथा या चित्रपटात आहे. 

हा चित्रपट म्हणजे गणितज्ज्ञ आनंद कुमार यांची बायोग्राफी आहे. मनोरंजक मूल्यांचा वापर करून चित्रपटाची कथा उत्कंठावर्धक बनवण्यात आली असली तरी त्यातील खरेपणा कुठेही लुप्त होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. वास्तववादी कथेचं शूटिंगही वास्तववादी लोकेशन्सवर करण्यात आल्यानं त्यातील खरेपणा उठावदारपणे समोर येतो. संजीव दत्ता यांनी पटकथेची मांडणी केली असून, 'राजा वही बनेगा, जो हकदार होगा', 'प्रतिभा दिए, साधन नहीं दिए ये चिटिंग नही तो और क्या है?' यांसारखे संवाद अर्थपूर्ण असून, विचार करायला लावणारे आहेत. यातील शाब्दिक चकमकीही चांगल्या झाल्या आहेत. विकास बहल यांनी चित्रपटाची मांडणीही चांगली केली आहे. कालावधी थोडा लांबल्यासारखा वाटतो. यासोबतच काही त्रुटीही राहिल्या असल्या, तरी त्याकडं दुर्लक्ष करता येण्यासारखं आहे.

आनंद कुमार यांची ही लढाई केवळ शैक्षणिक पातळीवरील नसून, भावनिक, आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, वैयक्तिक अशा विविध स्तरांवर अतिशय संघर्षपूर्ण राहिल्याचं चित्रपट पाहिल्यावर जाणवतं. हेच त्या ३० मुलांबाबतही म्हणावं लागेल. आधी त्यांनी समाजव्यवस्थेचं जोखड झुगारून देऊन, शिक्षणाच्या राजमार्गावर वाटचाल करत राजा बनण्याचं स्वप्न पाहिलं. मग प्रचंड मेहनतीनं त्यांनी ते साकारही केलं. हे पडद्यावर पाहण्याइतकं सोपं मुळीच नाही. सर्व गोष्टी उपलब्ध असूनही मागे राहणाऱ्या मुलांसाठी हा खूप मोठा धडा आहे. श्रीमंत-गरीब यातील दरी मिटवण्याचा शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. आज पैसेच सर्व काही असलं तरी बुद्धीला मोल नाही हेच खरं आहे. आनंद कुमार यांच्याकडे शिकण्यासाठी आलेल्या मुलांमध्ये कोणाचे वडील ड्रायव्हर, कोणाचे कचऱ्याचा ट्रक चालवणारे, कोणाचे गवंडी काम करणारे, कोणाचे मीठाच्या फॅक्ट्रीत मजदूरी करणारे असतात, पण शिक्षणरूपी अमृत प्राशन करून ते जणू आपल्या कुटुंबाचाही उद्धार करतात.

ज्ञान दिल्यानं वाढतं हा संदेश पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला आहे. मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांच्या जादुई हातांची किमया या चित्रपटात पुन्हा एकदा पहायला मिळते. अजय-अतुल या संगीतकार जोडीनं संगीतबद्ध केलेली गाणी प्रसंगानुरूप असून, कथेचा विषय आणि प्रवाह यांच्याशी एकरूप होणारी आहेत. 'पैसा...' या आयटम साँगची आवश्यकता होतीच असं नाही. व्हीएफएक्स आणि ग्राफिक्सचं कामही सुरेख झालं आहे. टायटलपासून शेवटच्या फाईट सिक्वेन्सपर्यंत त्याची कमाल पहायला मिळते. इतर तांत्रिक बाबीही चांगल्या आहेत.

ऋतिक रोशनचा अभिनय अफलातून आहे. त्यानं यापूर्वी साकारलेला कल्पनेतील सुपरहिरो क्रिष सुपरहिट झाला असला तरी हा वास्तवातील सुपरहिरो सर्वच बाबतीत त्याच्यापेक्षाही खूप मोठा आहे. यासाठी ऋतिकनं बारीकसारीक गोष्टींवर खूप मेहनत घेतल्याचं जाणवतं. यात बोलीभाषेपासून, देहबोलीपर्यंत सर्वच गोष्टींचा सराव केला आहे. मराठमोळी मृणाल ठाकूर लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे. तिनं साकारलेली आनंद कुमारच्या प्रेयेसीची भूमिका लक्षात राहण्याजोगी आहे. वडीलांच्या भूमिकेत वीरेंद्र सक्सेना आणि भावाच्या भूमिकेत नंदेश संधू यांनीही झकास काम केलं आहे. आदित्य श्रीवास्तव आणि पंकज त्रिपाठी यांनी नकारात्मक भूमिकांना रंग दिला आहे. अमित साध आणि मानव गोहिल यांच्या छोट्याशा भूमिकाही उत्कंठा वाढवणाऱ्या आहेत.

आनंद कुमार यांच्यासारखे बरेच अनसंग हिरोज प्रसिद्धीपासून दूर राहतात, त्यांच्यावर चित्रपटांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याची गरज आहे. आनंद कुमाररूपी सुपरहिरोची ही कथा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहेच, पण त्यासोबतच आपल्या ध्येयापासून परावृत्त होऊन पैशांच्या मागे धावणाऱ्या गुरूजनांनाही मार्गदर्शक ठरणारी असल्यानं 'सुपर ३०'चा हा यशस्वी फॅार्म्युला प्रत्येकानं पहायलाच हवा.


......................................

हिंदी चित्रपट : सुपर ३०

निर्माते : फँटम फिल्म्स, नाडीयादवाला ग्रँडसन एन्टरटेन्मेंट, रिलायन्स एन्टरटेन्मेंट

दिग्दर्शक : विकास बहल

लेखक : संजीव दत्ता

कलाकार : ऋतिक रोशन, मृणाल ठाकूर, वीरेंद्र सक्सेना, नंदिश संधू, अमित साध, पंकज त्रिपाठी, आदित्य श्रीवास्तव, मानव गोहिल, राहुल राज, दिपाली गौतम
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा