Advertisement

मेट्रोपाठोपाठ नाले रुंदीकरणासाठीही झाडांचा बळी?


मेट्रोपाठोपाठ नाले रुंदीकरणासाठीही झाडांचा बळी?
SHARES

मेट्रो रेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असतानाच बोरिवली आणि कांदिवलीतील नाले रुंदीकरणाच्या कामांमध्येही सुमारे २०० झाडांचा बळी द्यावा लागणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेम जागं होऊन मेट्रोला विरोध करणारी शिवसेना नाले रुंदीकरणातील झाडांच्या कत्तलीला पाठिंबा देईल की विरोध करेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


तरीही झाडं कापण्याचा प्रस्ताव 

मुंबईत सध्या मेट्रो रेल्वेची कामं युद्धपातळीवर सुरू असून विविध टप्प्यांमधील झाडांच्या कत्तलीवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मेट्रोसाठी झाडांची कत्तल करण्यास शिवसेनेनेसह इतर सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. पण शुक्रवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीपुढे नाल्यांचं रुंदीकरण आणि पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेच्या कामांमध्ये बाधित होणारी झाडे कापण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. 


मेट्रोला विरोध कायम 

कांदिवली पूर्व दामुपाडा बस डेपो ते महिंद्रा यलो गेट नाल्याचं बांधकाम तसेच बोरिवली पश्चिम येथे लिंकरोड ते चंदावरकर रोड आणि एक्सर रोड ते ठाकूर पाखडी चंदावरकर नाल्याची सुधारणा या बांधकामांमध्ये १८५ झाडे कापण्यात येणार आहेत. तर १२५ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहे. दोन नाल्यांच्या बांधकामांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात असल्याने मेट्रोला करण्यात येणार विरोध या प्रकरणातही कायम राहील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


सहाव्या मार्गिकेसाठी ७५ झाडे कापणार

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली या सहाव्या मार्गिकेच्या कामांमध्ये सुमारे ३०० झाडे आड येत असून त्यातील ७५ झाडे कापली जाणार आहेत. तर सुमारे १५० झाडेही पुनर्रोपित केली जाणार आहे. कांदिवली आणि बोरिवरी दरम्यानच एवढी झाडे कापली जाणार आहे.

पुनर्रोपित केलेली झाडेही जगत नसल्यामुळे एकप्रकारे या झाडांचाही बळी जातो. त्यामुळे रेल्वेच्या मार्गिकेमध्ये तसेच नाल्यांच्या रुंदीकरणामध्ये ३०० झाडे ही पुनर्रोपित करण्यात येणार असून या सर्व झाडांचं पुनर्रोपण मालाड, कांदिवली भागांमध्ये करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे कापण्यात येणाऱ्या २५० झाडांबरोबरच पुनर्रोपित केलेल्या ३०० झाडांचेही बळी जाणार असल्याचं वृक्ष तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


शिवसेनेचा झाडे कापण्यास विरोध असून प्रकल्पाला नाही. आज कोणतंही विकासकाम म्हटलं की शेकडोच्या संख्येने झाडं कापली जातात. त्यामुळेच मी पुन्हा प्रशासनाकडे मागणी करून ज्याप्रमाणे पूर्वी नगरसेवक कापण्यात येणाऱ्या झाडांची पाहणी करत होतो, तीच पद्धत पुन्हा सुरू करण्याची ठरावाची सूचना केली आहे.
- यशवंत जाधव, सभागृह नेते


अशाप्रकारे पाहणी केल्यानंतर खरोखरच विकासकामांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं कापण्याची गरज आहे का याची माहिती मिळत आहे. सध्या नगरसेवकांना ही झाडेच दाखवली जात नसल्यामुळे प्रशासन प्रस्ताव आणणार आणि तो मंजूर करून घेणार असाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे कमीत-कमी झाडे कापून प्रकल्प केला जावा हीच शिवसेनेची भूमिका आहे, असं सभागृहनेते यशवंत जाधव यांनी स्पष्ट केलं.


कांदिवली (पू.) दामुपाडा बस डेपो ते महिंद्रा यलो गेट नाल्याचे बांधकाम

  • एकूण झाडे : २०१
  • कापण्यात येणारी झाडे : १३४
  • पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे : ३५
  • बोरिवली पश्चिम येथे लिंकरोड ते चंदावरकर रोड आणि एक्सर रोड ते ठाकूर पाखडी चंदावरकर नाल्याची सुधारणा
  • एकूण झाडे : २१५
  • कापण्यात येणारी झाडे : ५०
  • पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे : ८५


नाल्याचं रुंदीकरण

  • मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेमधील पुलाचं बांधकाम
  • एकूण झाडे : ६३
  • कापण्यात येणारी झाडे : १७
  • पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे : ४२
  • कांदिवली पूर्व मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेमधील पुलाचे बांधकाम
  • एकूण झाडे : २२४
  • कापण्यात येणारी झाडे : ५८
  • पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे : ११९
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा