Advertisement

२८५ फुटावरून करता येणार मुंबई दर्शन


२८५  फुटावरून करता येणार मुंबई दर्शन
SHARES

नरिमन पॉइंटच्या उंचच उंच इमारती, फेसाळता समुद्र, मरीन ड्राइव्हचा क्वीन नेकलेस आणि गिरगाव चौपाटीवर उसळणाऱ्या उंचच ऊंच लाटांचं विहंगम दर्शन डोळ्यात साठवून घेण्याची संधी मुंबईकरांना लवकरच मिळणार आहे. दक्षिण मुंबईचं हे निसर्गसौंदर्य पाहाण्यासाठी मुंबई महापालिकेने मलबार हिलच्या हँगिंग गार्डन आणि कमला नेहरू पार्कजवळ एक 'व्ह्युइंग गॅलरी' उभारली असून डोळ्याचे पारणे फेडणारी ही निसर्गदृष्टी तब्बल २८५ फूट उंचीवरून टेलिस्कोपमधून मुंबईकरांना पाहता येणार आहे.

IMG-20181010-WA0100.jpg

'व्ह्युइंग गॅलरी' बांधण्याची मागणी

मलबार हिल येथे उंचावर पालिकेच्या जल विभागाच्या मालकीची जागा असून त्याचा वापर गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आला होता. या ठिकाणी प्रेक्षणीय 'व्ह्युइंग गॅलरी' बांधण्याची मागणी गिरगावचे तत्कालीन शिवसेना नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांनी केली होती. तब्बल २८५  फूट उंचावरील या गॅलरीतून मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी परिसराचा नजारा पाहता येणार असल्याचं बागलकरांनी पालिकेला दिलेल्या प्रस्तावात म्हटलं होतं. 

IMG-20181010-WA0098.jpg

पालिकेनं ही सूचना स्वीकारून अवघ्या दोन वर्षांत ही गॅलरी उभारली असून तिला दिवंगत ज्येष्ठ शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांचं नाव दिलं आहे. या गॅलरीचं उद्घाटन बुधवारी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, वंदना नवलकर आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आलं.

IMG-20181010-WA0103.jpg

या 'गॅलरी'मध्ये चारमजली इमारतीत लिफ्ट, टेलिस्कोप, बायनाक्युलर, पाणी विभागाचा नियंत्रण कक्ष, कॉन्फरन्स हॉल, उद्यान ऑफिस नव्याने बांधण्यात आले आहे. या कामांसाठी ११ कोटींचा खर्च करण्यात आला असून गॅलरीच्या बांधकामासाठी मालाड स्टोनचा वापर करण्यात आला आहे. तसंच स्‍टील आणि मोझेक काचेचे संरक्षक कठडे उभारण्यात आले असून या गॅलरीला काचेची पारदर्शी लिफ्ट, फ्लड लाइट, अॅम्‍फी थिएटरची सुविधा करण्यात आली आहे. दरम्यान या गॅलरीमुळे मुंबई दर्शन करण्यासाठी येणाऱ्या हजारो पर्यटकांना याचा लाभ घेता येणार आहे.


अशी आहे 'व्ह्युइंग गॅलरी'

  • बांधकामासाठी मालाड स्टोनचा वापर

  • गिरगाव चौपाटीपासून नरिमन पॉइंटपर्यंतचे दृश्य दिसणार

  • गॅलरीत एकावेळी ५० प्रेक्षकांना सोडण्यात येणार

  • सुरक्षेसाठी सुमारे दीड मीटर काचेचे तावदान

  • सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर हेरणार

  • दिव्यांगांसाठी लिफ्ट आणि खास रॅम्प

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा