Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ ही तलावांत ९९ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ ही तलावांत ९९ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. गेल्या २ वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळं मुंबईकरांचा पाणीप्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे. गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या दमदार पावसामुळं मुंबईकरांवरील पाणीकपातीचे वार्षिक विघ्न टळलं आहे.

जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळं तलावांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. मात्र, त्यानंतर ऑगस्टमध्ये राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी नोंदवले गेले. त्यामुळं धरणातील पाण्याचा साठा धिम्यागतीनं वाढत होता. त्यामुळं पाणीकपात करावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या दहा पंधरा दिवसात पडलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

७ ही तलावात मिळून ९९.२२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. उध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. ७ ही तलावातील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटरवर पोहोचल्यानंतर मुंबईकरांना वर्षभर पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. तसंच, तलावातील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल यादृष्टीनं महापालिकेच्या जल अभियंता खात्याकडून नियोजन केले जाते. 

१ ऑक्टोबरला सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असले तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो.

पाणीसाठ्याची टक्केवारी

  • उध्र्व वैतरणा - ९९.३६
  • मोडक सागर - ९९.९९
  • तानसा - ९९.१४
  • मध्य वैतरणा - ९७.४४
  • भातसा - ९९.५०
  • विहार - १००
  • तुळशी - १००
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा