Advertisement

मुंबईतील महापौरांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावरून आदित्य ठाकरे आक्रमक

चार महिन्यांत एकूण खर्च 5.3 कोटींवर

मुंबईतील महापौरांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावरून आदित्य ठाकरे आक्रमक
SHARES

मुंबई महापौरांच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणावर पुन्हा 2.9 कोटी रुपये खर्च करण्यावरून युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.  

"खर्चे पे चर्चा!" या आशयाखाली त्यांनी पालिकेच्या या निर्णयावर टीका केली आहे. 

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. मुंबई भाजपच्या महापौरांच्या हौस-मौजेसाठी मुंबईकरांचा पैसा खर्च करत आहे.

एकीकडे महापौरांच्या अधिकृत निवासस्थानाचे आधीच नूतनीकरण करण्यात आले असताना, आता पुन्हा त्याच्या सुशोभीकरणासाठी आणि तुलनेने शांत परिसरात ध्वनीरोधक (साउंड बॅरिअर) उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.

इतकेच नव्हे, तर सध्याच्या वाहनात प्रवास करताना अस्वस्थ वाटत असल्याच्या कारणावरून महापौरांसाठी नवीन गाडीचीही मागणी करण्यात आली आहे. हे सर्व सुरू असताना दुसरीकडे मुंबईतील मोकळ्या जागा खासगी संस्थांच्या ताब्यात दिल्या जात आहेत.

म्हणूनच भाजपला मुंबई महापालिकेवर सत्ता हवी होती, असा आरोप या पोस्टमधून करण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) यापूर्वी या वारसा वास्तूच्या नूतनीकरणासाठी 2.4 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. नवीन निविदेला मंजुरी मिळाल्यास केवळ चार महिन्यांत या निवासस्थानावरील एकूण खर्च 5.3 कोटी रुपयांपेक्षा अधिक होणार आहे.

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरातील या अधिकृत निवासस्थानात यापूर्वी मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा नवीन कामांसाठी निविदा काढण्यात आल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात या निवासस्थानी कधीही ध्वनीप्रदूषणाची समस्या जाणवली नसल्याचे सांगितले. तसेच वारसा वास्तूबाहेर तात्पुरते कंटेनरवर आधारित सभागृह उभारण्याची आवश्यकता काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नवीन प्रस्तावित कामांमध्ये ई. एस. पाटनवाला मार्गालगत बायो-अॅब्झॉर्बेंट ध्वनीरोधक पॅनेल बसविणे, कंटेनरवर आधारित सुसज्ज परिषद कक्ष उभारणे, इंटरलॉकिंग पेव्हर्स टाकणे, नवीन सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या, पाणीपुरवठा व इतर युटिलिटी सुविधा, पाण्याच्या टाक्या, घरगुती व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या खोल्यांचे नूतनीकरण तसेच यांत्रिक आणि विद्युत कामांचा समावेश आहे.

दरम्यान, या निविदेबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर महापौर कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महापौरांचे अधिकृत निवासस्थान ही वारसा वास्तू असून त्यासंदर्भातील सर्व कामे महापालिकेचा हेरिटेज देखभाल विभाग करतो.

सध्याची निविदा या विभागाने काढलेली नसून ती निवासस्थानाच्या आतील भागासाठी नाही, तर आजूबाजूच्या परिसरातील आणि प्राणिसंग्रहालय परिसरातील कामांसाठी आहे. तसेच महापौर ऋतु तावडे यांनी ही निविदा मागितलेली नसून त्यांना तिची माहितीही नव्हती, असे कार्यालयाने स्पष्ट केले.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व कामे वारसा संवर्धनाच्या नियमांचे पालन करून केली जाणार आहेत. निवासस्थानाची मूळ रचना आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये कायम राखत आवश्यक सुविधा विकसित करण्यात येतील.

महापौरांच्या बैठका आणि नागरिकांच्या भेटींसाठी लॉनवर तात्पुरते कंटेनर-आधारित परिषद कक्ष उभारण्याचाही प्रस्ताव आहे. तसेच परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा सुधारण्याची कामेही केली जाणार आहेत.

सुमारे 6,000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा वारसा बंगला 1931 मध्ये सागवान लाकूड आणि पारंपरिक कौलारू छतासह बांधण्यात आला होता.

नुकत्याच झालेल्या नूतनीकरणात आतील सजावट, फर्निचर, स्नानगृहे, तळमजल्यावरील अतिरिक्त शयनकक्ष, इटालियन मार्बल फ्लोअरिंग, आधुनिक स्वयंपाकघर तसेच वारसा शैलीतील झुंबर, प्रकाशयोजना आणि व्हेनेशियन डिटेलिंगचा समावेश करण्यात आला होता. सध्या या अधिकृत निवासस्थानी मुंबईच्या महापौर ऋतु तावडे आणि त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.



हेही वाचा

सिद्धिविनायक मंदिरातील घोटाळ्याप्रकरणाची होणार सखोल चौकशी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा