अतिक्रमण कराल तर तोडकाम निश्चित

 Kumbharwada
अतिक्रमण कराल तर तोडकाम निश्चित
Kumbharwada, Mumbai  -  

कुंभारवाडा - महापालिका सी विभागाच्या हद्दीतील कुंभारवाडा आणि चोर बाजार परिसरातील एम.एस.अली रोड मार्गावरील पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं. तसेच या रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांचा उपद्रव देखील वाढला होता. या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्याचा वापर करावा लागत होता. या सर्व बाबींमुळे रस्त्यावर काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील होत होती. 

पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सी विभाग फेरीवाला मुक्त करण्याचा निर्णय सी विभागातील सहाय्यक आयुक्त जिवक घेगडमल यांनी घेतला. जिवक घेगडमल यांच्या नेतृत्वाने पदपथावरील अतिक्रमणे आणि रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले यांच्या विरोधात बुधवारी दुपारी धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाई दरम्यान 20 अनधिकृत स्टॉल्स तोडण्यात आले. तसेच 10 अनधिकृत फेरीवाल्यांचे साहित्य देखील जप्त करण्यात आले. यामध्ये 4 सिलेंडर्सचा देखील समावेश होता. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे 10 कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह मुंबई पोलीस दलाचे पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. तसेच या कारवाईसाठी 1 जेसीबी आणि 2 डंपर वापरण्यात आले. त्यानंतर ही कारवाई यशस्वीपणे पार पाडून फुटपाथ मोकळा करण्यात आला.

Loading Comments