Advertisement

शोरुमसाठी गटईकाम करणाऱ्या निराधार महिलेवर कारवाई


शोरुमसाठी गटईकाम करणाऱ्या निराधार महिलेवर कारवाई
SHARES

आयुष्यातील डोक्यावरचे छत्र कायमचे हरपल्यानंतरही गटई काम करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या चिंगुबाई भोसले या निराधार महिलेचा वडाळा (प.) येथील आर. ए. किडवाई मार्गावर हिरा महल पदपथावर स्टॉल आहे. पालिकेच्या एफ उत्तर विभागाने शनिवारी कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचा स्टॉल हटवला आहे. त्यामुळे या निराधार महिलेवर उपासमारीची वेळ आली असून भर उन्हात बसून तिला हे गटई काम करावे लागत आहे.

गेल्या 40 वर्षांपूर्वी निवृत्ती रामचंद्र भोसले यांनी वडाळा पश्चिम स्थानकांसमोरील हिरा महल पदपथावर गटई व्यवसाय सुरू केला. कालांतराने अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. दरम्यान, त्यांचा मुलगा विलास भोसले ( 37) याने हा वारसा कुटुंबियांच्या उदरनिर्वहासाठी चालू ठेवला. हातात दुसरी नोकरी नसल्याने हा व्यवसाय त्याला सोयीचा वाटला. परंतु 1 जानेवारी 2017 रोजी त्याचे लिव्हरच्या आजाराने निधन झाले. अचानक झालेल्या या घटनेनंतर कुटुंबाची संपूर्ण विलास यांची पत्नी चिंगुबाई भोसले (32) यांच्या पदरात पडली. आपल्याला कोणाचा आधार नाही त्यामुळे आपल्यासह आपल्या चारही मुलींच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी आपल्याला पेलावी लागणार. यामुळे त्यांनी वडिलोपार्जित गटई व्यवसाय सुरू केला. भर उन्हात बसून त्या टाका - टीका करू लागल्या. परंतु पालिकेच्या एफ उत्तर विभागाकडून कोणतीही पूर्व सूचना न देता तिच्या स्टॉलवर तोडक कारवाई केली. याबाबत तिने कारवाई करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता तुमच्या स्टॉल समोरील सुपर हेअर ड्रेसर्स सलून आणि राशी नवरत्नच्या दुकानाचे मालक डॉ. अरविंद कटके यांनी तुमच्या गटई स्टॉलची तक्रार केली आहे. कारण तुमच्या स्टॉलमुळे त्यांच्या दुकानांची शोभा जात असल्याची तक्रार केल्याचं त्यांना सांगितल्याचं स्टॉल धारक चिंगुबाई भोसले म्हणाल्या.

भर उन्हात बसून गटई काम करणाऱ्या या महिलेला मनसेच्या रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाकडून चार फूट उंचीचा लोखंडी स्टॉल देण्यात आला होता. तसेच या स्टॉलवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये असे फलक देखील लावण्यात आले होते. परंतु विना नोटीस या स्टॉलवर पालिकेने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे, असे मनसे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शांताराम कारंडे यांनी सांगितले. याविरोधात पालिकेच्या एफ उत्तर कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशाराही कारंडे यांनी दिला.

याबाबत डॉ. अरविंद कटके यांच्याशी संपर्क साधला असता सध्या या विषयावर कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देऊ शकत नसल्याचे सांगत त्यांनी याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली. सदरील कारवाईबाबत पालिकेच्या एफ उत्तर विभागाचे वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण) महेश चौधरी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी गटई स्टॉल विना परवाना असून रहदारीला अडथळा ठरत असल्याबाबतची तक्रार अनुज्ञापन खात्याकडे आली होती. त्यानुसार ही कारवाई अतिक्रमण विभागाकडून करण्यात आली असल्याचे सांगितले. मात्र कोणत्या कलमांंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून याबाबत कोणी लेखी तक्रार केली आहे का याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे उत्तर अथवा लेखी तक्रारी बाबतचा अर्ज दाखवण्यासाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे आपण विना नोटीस कारवाई करता का? असे विचारले असता आम्ही नोटीस बजावतो असे सांगण्यात आले. मग या महिलेला नोटीस का बजावण्यात आली नाही? या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. आजवर पालिकेच्या कोणत्याही वॉर्डच्या वतीने करण्यात आलेल्या तोडक कारवाईपूर्वी संबंधित स्टॉलधारकांना नोटीसद्वारे कळवण्यात येते. परंतु या प्रकरणात मात्र पालिकेने हा मनमानी कारभार केला असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा