Advertisement

जैववैद्यकीय कचऱ्याच्या प्रमाणात मोठी वाढ


जैववैद्यकीय कचऱ्याच्या प्रमाणात मोठी वाढ
SHARES

कोरोना रुग्णांची वाढती संख्येप्रमाणं जैववैद्यकीय कचऱ्यातही आता मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या कचऱ्याचं प्रमाण सप्टेंबर महिन्यात १०० टनापलीकडे पोहचलं आहे. जैववैद्यकीय कचऱ्यातील वैयक्तिक सुरक्षा साधनांच्या (पीपीई किट) वाढत्या प्रमाणामुळ तसेच अलगीकरण केंद्रातील इतर अजैववैद्यकीय सामग्रीची सरमिसळ होत असल्याने कचरा विल्हेवाट केंद्र आणि यंत्रसामग्रीवर अनावश्यक ताण येतो. ऑगस्टमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित नियमावली लागू केल्यानंतर हा ताण कमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका दिवसाला राज्यातील एकूण जैववैद्यकीय कचरा सप्टेंबर महिन्यात १०० टनापलीकडे पोहचला आहे. कोरोनापूर्व काळातील नेहमीच्या जैववैद्यकीय कचऱ्यापेक्षा सुमारे ४० टन अधिक कचरा सध्या तयार होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तसे एप्रिल महिन्यातील दिवसाला ६.९६ टन कोव्हिड जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण मे महिन्यात दुप्पटीहून अधिक झाले. जून महिन्यात ते ३०.३७ टनावर पोहचले.

इतर वैद्यकीय उपचार वाढू लागल्यावर जुलैमध्ये इतर जैववैद्यकीय कचरा पुन्हा कोरोनापूर्व काळा इतकाच म्हणजे ६० टनापर्यंत पोहचून एकूण जैववैद्यकीय कचरा ९० टनाच्या आसपास पोहचला. मात्र एकूणच वैद्यकीय उपचारातील सुरक्षासाधनांच्या वाढत्या वापरामुळे एकूण जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण सप्टेंबरमध्ये १०३.८५ टनावर पोहचले आहे.

सप्टेंबर महिन्यात ८ तारखेस राज्यात कोविड जैववैद्यकीय कचरा ४९ टन असून, इतर जैववैद्यकीय कचरा ५४.८५ टन इतका असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट केंद्रांची एकूण क्षमता ही सुमारे ६० टन इतकी आहे. मात्र वाढत्या जैववैद्यकीय कचऱ्याचा ताण केंद्रावर येऊ लागल्यानंतर कोविड जैववैद्यकीय कचरा तळोजा येथील घातक कचरा विल्हेवाट केंद्रावर पाठविण्यात येऊ लागला.

संबंधित विषय