Advertisement

तुंबलेल्या पाण्यातही भाजपाचं राजकारण


तुंबलेल्या पाण्यातही भाजपाचं राजकारण
SHARES

शनिवारी मुंबईतील अनेक भागांमध्ये तुंबलेल्या पाण्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागला. मात्र, याला महापालिका प्रशासन आणि त्यांची यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप सभा तहकुबीच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी केला. मुंबईकरांना झालेल्या या त्रासाबद्दल प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरत असतानाच भाजपाने मात्र यात राजकारण केलं. स्थायी समितीत भाजप विरोध करत असलेल्या प्रस्तावांच्या बाजूने आपण मतदान करत असल्यानं मदतीची अपेक्षा कशी बाळगता? असा सवाल त्यांनी विरोधी पक्षांना करत या तुंबलेल्या पाण्यातही भाजपनं राजकारणाची पोळी भाजून घेतली.


पाणी तुंबलं नाही तर...

मुंबईत ९८ टक्के नालेसफाई झाली असून यंदा पाणी तुंबणार नाही, असा दावा महापालिका प्रशासन आणि महापौरांनी केला होता. तरीही शनिवारी मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कल, शीव आदी भागांसह अनेक भागांमध्ये पाणी तुंबलं होतं. मात्र, महापौर सांगतात पाणी तुंबलं नाही तर साचलं होतं म्हणून!


पाणी तुंबण्याची २२५ ठिकाणं

दहिसरमध्ये झाड पडून एका मुलीचा बळी गेला. दादरमध्ये चार जण झाड पडून जखमी झालेत. झाडांच्या फांद्यांची छाटणी होऊनही झाडे पडत आहेत. यंदा पाणी तुंबण्याची २२५ ठिकाणं असली तर नालेसफाईंची काम न झाल्यानं अनेक नवीन पाणी तुंबण्याची ठिकाण तयार झाली आहे, असं सागत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध म्हणून सभा तहकूब करण्याची सूचना स्थायी समितीत मांडली होती.


पाण्याची पातळी का वाढली?

शनिवारी झालेल्या पावसात उपनगरातील मोठे नाले भरलेले होते. जर पाऊस कमी होता तर मग पाण्याची पातळी एवढी का वाढली जातेय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी प्रगत असलेल्या परदेशातही दोन दोन दिवस पाणी तुंबलं जातं असं सांगत मुंबईतील तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्याचं काम महापालिकेच्या कामगार् कर्मचाऱ्यांनी योग्यप्रकारे केल्याचं सांगितलं.


व्यवस्थापन आराखडाच नाही

वांद्रे पश्चिम येथे केवळ ६७ मि.मी एवढाच पाऊस पडला. तरीही अनेक भागांमध्ये पाणी तुंबलं होतं, असं काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया सांगितलं. मुंबई महापालिकेकडे आपत्कालिन व्यवस्थापन आराखडाच नसल्याचा आरोप करत सपाचे रईस शेख यांनी सात रस्ता ते हाजी अलीपर्यंतचे सर्व मॅनहोल्स तपासत गेलो, पण त्यात पाणी जात नव्हतं, असं सांगितलं.


विरोधी पक्ष गंभीर नाही

या सभा तहकुबीवर बोलतांना, भाजपाचे मनोज कोटक यांनी विरोधी पक्ष गंभीर नसल्याचा आरोप केला. या समितीपुढे जेव्हा-जेव्हा एखाद्या प्रस्तावाचा विरोध केला, तेव्हा विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षासोबत राहिला. तुम्ही जर तेव्हा आमच्याबाजूनं राहिला असता तर आज या सभा तहकुबीला आम्ही पाठिंबा दिला असता, असं सांगितलं.

शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी जे काही प्रस्ताव मंजूर केले ते मुंबईकरांच्या भल्यासाठीच होते, असं सांगत छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी कायमस्वरुपी कामगार भरती करण्याची मागणी त्यांनी केली.


तरीही नागरीक कचरा टाकतात

नालेसफाईचं काम झाल्यानंतरही नागरिक कचरा टाकत असल्याचं नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी सांगितलं, तर याबाबत मुंबईकरांमध्ये सिव्हीक सेन्सबाबत जनजागृती करण्याचं आवाहन सभागृहनेते विशाखा राऊत यांनी केलं. त्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विराधी पक्षनेत्यांनी मांडलेली सभा तहकूबी मतास टाकून बहुमताच्या जोरावर ती बाद ठरवली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा