Advertisement

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या खर्चात पुन्हा होणार वाढ

नवीन संस्थेच्या नियुक्तीस विलंब होत असल्यानं पालिका प्रशासनानं जुन्याच कंपनीला दीड महिन्याचा कालावधी वाढवून दिला आहे.

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या खर्चात पुन्हा होणार वाढ
SHARES

भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेच्या (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय) पेंग्विन कक्षाच्या देखभालीचे कंत्राट यापूर्वीच वादात सापडले होते. मात्र नवीन संस्थेच्या नियुक्तीस विलंब होत असल्यानं पालिका प्रशासनानं जुन्याच कंपनीला दीड महिन्याचा कालावधी वाढवून दिला आहे. या वाढीव कालावधीसाठी महापालिका तब्बल ४५ लाख रुपये मोजणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी प्रशासनानं मांडला आहे. मात्र खर्चाला आधीपासून सदस्यांचा विरोध असल्यानं पुन्हा खर्चावरून वादाचे खटके उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राणी बागेच्या नूतनीकरणादरम्यान २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून हॅम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. यासाठी राणीबागेत पेंग्विन कक्ष तयार केला आहे.

या पक्ष्यांचे व कक्षाची व्यवस्थापन प्रणाली महापालिकेकडे नसल्यानं ११ सप्टेंबर २०१८ रोजी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीची ३६ महिन्यांकरिता नेमणूक केली होती. ही मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात आली. यासाठी मागविलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नवीन कंपनीची निवड न केल्यानं प्रशासनानं मुदत संपुष्टात आलेल्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला आणखी ४५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला.

हा कालावधी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी संपुष्टात येत आहे. मात्र अद्यापही नवीन कंपनी न मिळाल्याने स्थायीने २०१८ मध्ये मंजूर केलेल्या प्रस्तावातील त्रुटींच्या आधारे मुदतवाढ दिली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा