
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (bmc) आयुक्त अश्विनी भिडे (ashwini bhide) यांनी पादचाऱ्यांसाठी (hawkers) सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'पादचारी प्रथम' (Pedestrian First) मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यासाठी पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले आणि अतिक्रमणे त्वरित हटवण्यास सांगण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी, अश्विनी भिडे यांनी बुधवारी मुंबईच्या (mumbai) पश्चिम उपनगरातील 'के-वेस्ट' (K West) आणि 'पी-साउथ' (P South) विभागांची पाहणी केली.
तसेच त्यांनी विलेपार्ले (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद रोड आणि राम गणेश गडकरी मार्गावरील पदपथांना भेट दिली. या भागात कूपर रुग्णालय आणि जवळच असलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे पादचाऱ्यांची (pedestrian) मोठी वर्दळ असते.
रुग्ण, रुग्णवाहिका आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असल्याने, स्वामी विवेकानंद रोड ते कूपर रुग्णालय यांना जोडणारा मार्ग 'प्राधान्य मार्ग' (priority corridor) म्हणून महापालिकेने निश्चित केला आहे.
'पादचारी प्रथम' मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, नागरिकांना चालण्यासाठी विनाअडथळा आणि सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईभरातील 320 किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.
'के-वेस्ट' विभागात एकूण 355 रस्त्यांपैकी 27 रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात या रस्त्यांवरील सुमारे 37.7 किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अतिक्रमणे हटवली जातील.
पदपथांवरील सर्व अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे आणि इतर अडथळे त्वरित हटवण्याचे निर्देश अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
तसेच, पदपथ अधिक पादचारी-स्नेही (pedestrian-friendly) बनवण्यासाठी सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेचे उपाय योजण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
या पाहणीदरम्यान सह-आयुक्त (झोन 4) डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त प्रशांत गायकवाड आणि 'पी-साउथ' विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वाळवी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा
