Advertisement

राणीबागेत पाहायला चला डॉल्फिन, जलपरी


राणीबागेत पाहायला चला डॉल्फिन, जलपरी
SHARES

स्टारफिश, ऑक्टोपस, कासव असे जलचर बघायचे झाल्यास आपल्याला मत्स्यालयातच जावं लागतं. डॉल्फिनदर्शन तर दुर्लभच. परंतु या जलचराचं दर्शन तुम्हाला भायखळ्याच्या राणीबागेत मिळणार असेल तर? तेही अनोख्या स्वरूपात? हे वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरं आहे! तुम्हाला या सर्व जलचरांचं दर्शन फुलांच्या प्रतिकृतीतून घडणार आहे. निमित्त आहे ते उद्यान विषयक प्रदर्शनाचं.

महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या वार्षिक उद्यान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे .या प्रदर्शनाचा शुभारंभ शुक्रवार ९ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.पहिल्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ८ पर्यंत, तर १० व ११ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ या दरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे.


कृत्रिम नदी

या प्रदर्शनात यंदा जलप्रदूषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने १०० मीटरची कृत्रिम नदी तयार करण्यात आली आहे. पानाफुलांपासून तयार करण्यात आलेली लहानग्यांची आवडती जलपरी आणि शिकारा(काश्मिरी पद्धतीची नाव) देखील या नदीमध्ये असणार आहे.

यासोबतच डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, अॅनाकोंडा यासारख्या जलचरांच्या वा इतर प्रकारातील प्राण्यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात साकारण्यात आल्याची माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. या प्रतिकृती साकारण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागातील ४० कामगार-कर्मचारी- अधिकारी गेले ३ महिने दिवस-रात्र मेहनत घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.


कोणती झाडं पाहायला मिळणार?

शुक्रवारी ९ फेब्रुवारी २०१८ पासून सुरु होणाऱ्या या प्रदर्शनात विविध प्रजातींची १० हजारांपेक्षा अधिक झाडे बघावयास मिळणार आहेत. यामध्ये कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय, वेली यांचा समावेश आहे.

तसेच विविध प्रकारची तुळशीची झाडे, बेल, हळद, कापूर, आवळा, बेहडा, हिरडा, चंदन बडीशेप, अश्वगंधा, बदाम, काजू यासह हात लावताच पाने मिटून घेणारं लाजाळूचं झाड, यासारखी अनेक औषधी व सुगंधी झाडे देखील या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहेत. यासोबतच जिरे, मिरे, विलायची, लवंग, जायफळ, धणे यासारख्या मसाल्यात टाकावयाच्या पदार्थांची झाडे, जी एरवी आपल्याला केरळमध्येच बघायला मिळाली असती, ती देखील या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईतच बघायला मिळणार आहेत.


परदेशी भाज्यांचं प्रदर्शन

यावर्षीच्या प्रदर्शनात परदेशी भाज्यांचे एक स्वतंत्र दालन तयार करण्यात आलं आहे. त्यामध्ये झुकिनी, टुर्निप, नवलकोल, ब्रोकिली, रेड कॅबेज आणि बर्गरमध्ये वापरण्यात येणाऱ्या लेट्यूस सारख्या भाज्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शोभेच्या झाडांसाठीही एक स्वतंत्र विभाग या प्रदर्शनात तयार करण्यात आला आहे. यामध्ये मयूरपंखी, ब्रह्मकमळ, ख्रिसमस ट्री, निवडुंग, लिली, जरबेरा यासारखी अनेक शोभेची झाडं आहेत. झाडांमध्ये अत्यंत महागडे समजले जाणाऱ्या 'बोनसाय' अर्थात बटुवृक्षाचीही अनेक रुपे या प्रदर्शनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत.


मार्गदर्शनासाठी १० कार्यशाळा

ज्यांना आपल्या घरी किंवा सोसायटीच्या अंगणात किंवा फार्म हाऊसमध्ये बाग फुलवायची आहे, त्यांना बागकामाची व झाडांची प्राथमिक व शास्त्रोक्त माहिती मिळावी, या उद्देशाने उद्यानाशी संबंधित १० वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळांचेही आयोजन प्रदर्शन कालाधीत करण्यात आले आहे. अत्यल्प नोंदणी शुल्क असणाऱ्या या कार्यशाळांमध्ये कोणीही नागरिक नाव नोंदवू शकतो.

यानुसार ९ ते ११ फेब्रुवारी २०१८ दरम्यान आयोजित होणाऱ्या सर्व १० कार्यशाळांमध्ये ५०० रुपये शुल्क भरून सहभागी होऊ शकता. तसंच १० पैकी एखाद्या किंवा काही कार्यशाळांमध्ये सहभागी व्हायचं असल्यास प्रति कार्यशाळा रुपये १०० एवढे शुल्क आकारण्यात येणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्वांना महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे प्रमाणपत्र व माहितीची संगणकीय प्रत देण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा