Advertisement

मुंबईकरांनो, याद राखा! २३ जूनपासून प्लास्टिक पिशवी वापराल तर...


मुंबईकरांनो, याद राखा! २३ जूनपासून प्लास्टिक पिशवी वापराल तर...
SHARES

राज्यात प्लास्टिकबंदी जाहीर झाल्यानंतर आता २३ जूनपासून प्लास्टिक पिशव्या हाताळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेची पथकं तयार झाली असून मार्केट, परवाना विभाग, दुकान आणि आस्थापना विभागाच्या निरीक्षकांची स्वतंत्र पथकं तैनात करण्यात येत आहेत.


हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी मुंबईत करण्यासाठी महापालिका विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहे. प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करून नागरिकांना प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स आणि अन्य प्लास्टिकच्या वस्तू जमा करण्याचं आवाहन केलं जात आहे. यासाठी महापालिकेने प्रत्येक विभागांमध्ये प्लास्टिक कलेक्शन पेटी ठेवण्यात आली आहे. तसंच हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे.


पालिकेतर्फे जनजागृती सुरू 

प्लास्टिक बंदीबाबत महापालिकेतर्फे जोरदार जनजागृती सुरू आहे. मात्र, २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू होत असल्यानं प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याचसोबत महापालिकेनं कचऱ्याची विल्हेवाट आणि दंडात्मक कारवाई करण्यासाठी तीन स्वतंत्र पथकं तयार केली आहेत. परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट, दुकाने आणि फेरीवाले अशा तीन विभागांमध्ये वर्गवारी करून ही कारवाई करणार आहे.


निरीक्षकांची फौज तयार

दुकानांमधील प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दुकान आणि आस्थापना विभागाचे निरीक्षक कारवाई करतील. मंडईंमधील गाळे आणि विक्रेते यांच्यावर मंडईतील निरीक्षक कारवाई करतील. तर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या फेरीवाल्यांवर परवाना विभागाचे निरीक्षक दंडात्मक कारवाई करतील, असं उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं. या तिन्ही विभागांसाठी 200 हून अधिक निरीक्षकांची फौज तयार करण्यात आली आहे. यामध्ये दुकानांमधील प्लास्टिकवर कारवाई करणाऱ्या दुकाने आणि आस्थापना विभागाच्या निरीक्षकांची तयारी झाली आहे. तर उर्वरीत दोन विभागांच्या निरीक्षकांची यादी आयुक्तांच्या मान्यतेनंतर पुढील दोन-चार दिवसांमध्ये संकेतस्थळांवर अपलोड केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.


प्लास्टिकवर कारवाई करणारे जॅकेटधारी

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करताना, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ओळखता यावे, यासाठी या पथकातील सर्व निरीक्षकांना वेगळ्या रंगाचा जॅकेट दिलं जाणार आहे. तर डोक्यावर टोपी असणार आहे. यावर महापालिकेचा लोगो आणि प्लास्टिक निर्मुलन टीम असं लिहिलेलं असेल. तसंच त्या अधिकाऱ्यांचं ओळखपत्रही लावलेलं असेल. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करणं टाळावं आणि प्लास्टिक मागूही नये आणि स्वीकारूही नये, असं आवाहन निधी चौधरी यांनी केलं आहे.

सर्व नागरिकांना आपल्याकडे असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांसह सर्व प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याची संधी दिली आहे. परंतु, २३ जूननंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर जर नागरिक करणार असतील तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी नागरिकांसह दुकानदार, गाळेधारक आणि फेरीवाले यांनी आजपासून प्लास्टिकचा वापर करणं टाळावं, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा