Advertisement

कर थकविणार्‍या कंपनीचे पालिकेने हेलिकॉप्टर्स जप्त केले

पालिकेने कराची थकबाकी वसूल करण्यासाठी या कंपनीचे दोन हेलिकॉप्टर्सच जप्त केले आहेत

कर थकविणार्‍या कंपनीचे पालिकेने हेलिकॉप्टर्स जप्त केले
SHARES

एरवी रस्त्यांवर खड्डा खणला किंवा बॅनर्स लावले म्हणून दंड आकारणारी मुंबई महानगरपालिका एका धडक कारवाईमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर थकविणार्‍या मेस्को एअरलाईन्सला चांगलाच दणका दिला. पालिकेने कराची थकबाकी वसूल करण्यासाठी या कंपनीची दोन हेलिकॉप्टर्सच जप्त केले आहेत. पालिकेवर सध्या मोठ्या प्रकल्पांचा भार लक्षात घेता ही कारवाई केल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.


पालिकेचा महत्त्वाचा महसुलाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेच्या करनिर्धारण विभागाने आता मोठमोठय़ा कंपन्यांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. जकात बंद झाल्यानंतर पालिकेची सगळी आर्थिक मदार मालमत्ता करातून येणाऱ्या उत्पन्नावरच आहे. मात्र मोठमोठय़ा कंपन्यांनी पालिकेचा मालमत्ता कर मोठय़ा प्रमाणावर थकवला आहे. या करवसुलीसाठी करनिर्धारण विभागाने आता कंबर कसली आहे. गेल्या आठवडय़ात रस्त्यांवरून दवंडी पिटल्याप्रमाणे ध्वनिक्षेपकावरून मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली. या वर्षी पालिकेच्या करनिर्धारण विभागाची वसुली चांगलीच घटली आहे. आर्थिक वर्ष संपत आले तरी केवळ ३००० कोटींची वसुली झालेली असल्यामुळे पालिकेने आता मालमत्तांना नोटिसा धाडणे, जप्ती, पाणी तोडणे अशा कारवाया सुरू केल्या आहेत.या वर्षी मालमत्ता करवसुलीसाठी ५१०० कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

करनिर्धारण विभागाला महिन्याभरात २००० कोटींची तूट भरून काढावी लागणार आहे, तर गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी संस्थांनी थकवलेल्या मालमत्ता कराची संचित थकबाकी १५००० कोटींवर गेली आहे. मोठय़ा १०० थकबाकीदारांची यादी नुकतीच पालिकेने जाहीर केली असून मोठय़ा १० थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या या धडक कारवाईची चांगलीच चर्चा रंगली आहे. मेस्को एअरलाईन्सने तब्बल १,६४,८३,६५८ रुपयांचा मालमत्ता कर थकवला होता. पालिकेने वारंवार नोटीस पाठवूनही मेस्को एअरलाईन्सने कराची रक्कम भरली नाही. त्यामुळे शेड्युल के अंतर्गत पालिकेने मेस्को एअरलाईन्सची दोन हेलिकॉप्टर्सच ताब्यात घेतली.

संबंधित विषय