Advertisement

नालेसफाई होऊनही दक्षिण मुंबई तुंबणार!


नालेसफाई होऊनही दक्षिण मुंबई तुंबणार!
SHARES

मुंबईतील नाल्यांच्या सफाईचं काम यंदा वेळेवर हाती घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पण यांत शहर भागातील ब्रिटीशकालीन पावसाळी गटारांच्या सफाई कामाचा समावेश नाही. तब्बल १०० किलोमीटरची ही ब्रिटीशकालीन गटारे मागील अनेक वर्षांपासून साफ झाली नसल्याने यंदाच्या पावसाळ्यातही दक्षिण मुंबईत पाणी तुंबण्याची भीती कायम आहे.


१ ते ४ फूट गाळ

मुंबई शहर भागात ब्रिटीशकालीन भूमिगत पावसाळी गटारांचं जाळं आहे. या गटारांमधूनच पावसाचं पाणी वाहून नेलं जातं. त्यामुळे या गटारांची नीट स्वच्छता होणं गरजेचं आहे. मात्र या गटारांतून केवळ मनुष्यप्रवेश असलेल्या भागापुरताच गाळ काढला जातो. दोन मॅनहोल्स दरम्यानचा गाळ तसाच वर्षोनुवर्षे जमा होत १ ते ४ फुटांपर्यंत साचला आहे. त्यामुळे यंदाही या भूमिगत गटारांमधील गाळ काढण्याचा विचार प्रशासनाने न केल्यास शहर भागात पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे.



पंम्पिग स्टेशन असूनही

दक्षिण मुंबईत हाजी अली, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड बंदर तसंच ब्रिटानिया आऊटफॉल याठिकाणी ४ उच्च क्षमतेचे पंम्पिग स्टेशन आहेत. या पंम्पिग स्टेशनच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने केला जातो. परंतु ४ पंम्पिग स्टेशन असूनही पावसात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतच आहेत.

भूमिगत गटारे साफ केल्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी दीड ते दोन तासांचा लागणारा अवधी अर्ध्या तासापर्यंत येऊ शकतो. परंतु त्यासाठी ब्रिटीशकालीन गटारांची सफाई होणं गरजेचं आहे. पण सद्यस्थितीत तब्बल ९० कि.मी लांबीची गटारे गाळाने भरलेली असल्याचं अधिकाऱ्यांकडून समजत आहे. त्यामुळे जोपर्यंत हा गाळा साफ होत नाही, तोपर्यंत इथं पाणी तुंबणारच, असं दिसून येत आहे.


सफाईसाठी रोबोचा वापर

रस्त्याखालून जाणाऱ्या ब्रिटीशकालीन भूमिगत पावसाळी गटारांमधील गाळ काढताना तो केवळ मॅनहोल्सच्या भागातलाच काढला जातो. हा गाळ काढण्यासाठी गटारांमधील दोन्ही बाजूकडील पाण्याचा प्रवाह रोखून धरला जातो. परंतु आता हा गाळ रोबोटिक मशिनद्वारे काढण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका एक रोबोटिक मशिन खरेदी करणार आहे. या रोबोटिक मशिन खरेदीला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.


८ ते १० महिने लागणार

या रोबोटिक मशिनद्वारे पाण्याचा प्रवाह न रोखता गाळ काढता येतो. या मशिनला सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने आत किती गाळ शिल्लक आहे, याची माहिती मिळते. या मशिनच्या खरेदीला मंजुरी मिळाली असली, तरी प्रत्यक्षात ही मशिन येण्यास ८ ते १० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यंदा या मशिनचा काहीही उपयोग होणार नसल्याचं पर्जन्य जलविभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे गाळ शोषून तो सुकवण्याची या मशिनमध्ये व्यवस्था आहे. त्यामुळे हा गाळ काढून मॅनहोल्सच्या बाजूला सुकेपर्यंत जमा करून ठेवण्याची गरज नसल्याचंही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.



खासगी कंत्राटदारांकडे काम

मुंबईतील रस्त्यालगतच्या नाल्यांची सफाई दरवर्षी खासगी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केली जाते. परंतु यंदा प्रथमच या रस्त्यालगतच्या नाल्यांच्या सफाईचं काम खासगी कंत्राटदारांना देण्यात आलं आहे.


नालेसफाईचे प्रस्ताव फेब्रुवारीतच मंजूर

मुंबईतील मिठी नदीसह पूर्व उपनगरातील मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. या तिन्ही प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी दिली. नालेसफाईचे प्रस्ताव मंजुरीला आल्यानंतर पहिल्या प्रयत्नात मंजूर होण्याचा हा महापालिकेच्या इतिहासातील पहिला प्रयत्न आहे. त्यामुळे या मंजुरीनंतर कार्यादेश देऊन एप्रिलच्या पहिल्याच तारखेपासून या कामाला सुरुवात होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा