Advertisement

अखेर महापालिकेच्या ‘सी’, ‘बी’ विभागाला लाभले सहायक आयुक्त


अखेर महापालिकेच्या ‘सी’, ‘बी’ विभागाला लाभले सहायक आयुक्त
SHARES

मुंबई महापालिकेच्या बी विभागाचे सहायक आयुक्त उदयकुमार शिरुरकर सेवानिवृत्त झाल्यामुळे तसंच सी विभागाचे सहायक आयुक्त जीवक घेगडमल यांना निलंबित केल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर अखेर विवेक राही आणि सुनील सरदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांना अखेर बऱ्याच कालावधीनंतर सहायक आयुक्त लाभले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची प्रभारी सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.


म्हणून केली नियुक्ती

सी विभागाचे सहायक आयुक्त जीवक घेगडमल यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणी निलंबित केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून हे पद रिक्तच होतं. त्यामुळे याची जबाबदारी बी विभागाचे सहायक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांच्याकडे दिली होती. दरम्यान उदयकुमार शिरुरकर यांची प्रकृती बिघडल्यामुळे तेही रजेवर होते. परंतु, ३१ जून रोजी शिरुरकर ते सेवानिवृत्त झाले. त्यामुळे महत्त्वाचे असे दोन्ही प्रभाग सहायक आयुक्तविनाच असल्यानं या रिक्तजागी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी होत होती.


सात उमेदवारांमध्ये यांची निवड

गेल्याच आठवड्यात लोकसेवा आयोगाने सहायक आयुक्तपदाच्या परीक्षेतील अंतिम उत्तीर्ण सात उमेदवारांची यादी जाहीर केली. यामधील मुंबई मलनि:सारण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विवेक राही यांची बी विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे, तर घनकचरा व्यवस्थापन प्रचलन विभागाचे उपप्रमुख अभियंता सुनील सरदार यांची सी विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्यावतीनं या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश शुक्रवारी १३ जुलै रोजी बजावण्यात आले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा