Advertisement

१६ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर जलवाहिनी दुरुस्तीला यश

१८ नोव्हेंबरपासून सुरू झालेलं हे दुरूस्तीचं काम बुधवार ३ डिसेंबरच्या मध्यरात्री १:३० वाजताच्या सुमारास संपलं.

१६ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर जलवाहिनी दुरुस्तीला यश
SHARES

महापालिकेच्या जी दक्षिण विभागात असलेली ब्रिटिशकालीन तानसा (पूर्व) मुख्य जलवाहिनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अखेर दुरूस्त केली. १८ नोव्हेंबरपासून सुरू झालेलं हे दुरूस्तीचं काम बुधवार ३ डिसेंबरच्या मध्यरात्री १:३० वाजताच्या सुमारास संपलं. जलवाहिनीला फुटल्याची माहिती मिळताचं पालिकेच्या तातडीचा दुरुस्ती विभाग-वरळी घटनास्थळी धाव घेत दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली. सुरूवातीला बाहेरून जलवाहिनीची गळती बंद करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी अहोरात्र काम करत होते. मात्र, गळती काही केल्या थांबत नसल्यानं अखेर पाणीपुरवठा बंद करत जलवाहिनीत शिरूनच गळती बंद करण्यात आली.

जी दक्षिण विभागात असलेल्या दीपक सिनेमागृहा समोरील परिसरात जलवाहिनी फुटली होती. परंतु नेमकी कोणत्या ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे, ते समजत नव्हतं. त्यामुळं महापालिकेच्या जल कामं विभागाचे सहाय्यक अभियंता जीवन पाटील यांनी 'साऊंड रॉड' या तंत्राच्या माध्यमातून गळती शोधक पथकाच्या सहाय्यानं ही तपासणी केली व गळती असल्याची शंका येताच खोदकामाला सुरूवात केली. जलवाहिनी फुटून पाण्याची गळती होत असल्यानं रस्ता खचला होता.

तानसा (पूर्व) मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम हे पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आव्हानात्मक होतं. कारण मुख्य जलवाहिनी ही २० ते २५ फूट खोल होती. त्यामुळं खोदकाम करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. या खचलेल्या रस्त्यात मुख्य गटार, पर्जन्यजलवाहिनी आणि टाटा कंपनीच्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या असून, त्याच्या खाली गळती असलेली जलवाहिनी होती. त्यामुळं पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावं लागत होतं.

मुख्य जलवाहिनी असल्यामुळं मुंबईकरांचा पाणीपुरवठा खंडित न करता जलवाहिनी दुरूस्त केली जात होती. त्यासाठी जलवाहिनीची बाहेरून गळती थांबवण्याचा पालिकेचा प्रयत्न होता. त्यानुसार, पालिकेच्या जलविभागातील कर्मचाऱ्यांनी जलवाहिनीच्या बाजूनं २ ते ३ दिवसांच्या आहोरात्र खोदकाम करत सुमारे २५ ते ३० फुट खोल खड्डा खणत गळतीचं ठिकाण शोधून काढलं. त्यानंतर गळतीच्या ठिकाणी लाकडाच्या खुट्या ठोकून आणि त्याजागी एम. एस. पॅच स्क्रू जॅकच्या साहाय्यानं गळती रोखली. मात्र जलवाहिनीच्या पुढील भागांत आणखी मोठी दुसरी गळती सुरू असल्याचं निदर्शनास आलं. मात्र, त्या ठिकाणी कठीण पाषाण असल्यानं अधिक खोलवर खोदकाम करून गळती नियंत्रणात आणणं शक्य नव्हतं.

परिणामी, जलवाहिनीत शिरून दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, २ ते ३ डिसेंबरला या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पालिकेकडून हाती घेत २ डिसेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून ३ डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजता काम पूर्ण करण्याचं पालिकेचं नियोजन होतं. निश्चित वेळेनुसार काम पूर्ण करत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि जी उत्तर व जी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा पुर्वरत केला.

ब्रिटिशकालीन तानसा (पूर्व) मुख्य जलवाहिनी दुरूस्त करण्यासाठी मुंबईचा पाणीपुरवठा ६ ते ७ दिवस बंद ठेवण्याची आवशक्यता होती. मात्र, पालिकेच्या तातडीचा दुरुस्ती विभागानं अहोरात्र काम करत केवळ १ दिवस पाणीपुरवठा बंद ठेवत जलवाहिनी दुरूस्त केली. कमी वेळात जलवाहिनी दुरूस्त केल्यानं तब्बल लाखो लीटर पाण्याची बचत झाली.

- जीवन शंकर पाटील, महापालिका सहाय्यक अभियंता जल कामं (तातडीचा दुरुस्ती विभाग - वरळी).

तानसा पूर्व मुख्य जलवाहिनी

मुंबईला ७ तलावांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामधील एक म्हणजे 'तानसा' तलाव. तानसा तलावातून येणारी जलवाहिनी ही मुंबईतल्या मुंबई सेंट्रल येथील नानाचौकपर्यंत (पालिका डी विभाग) आहे. या जलवाहिनीची मुंबई शहराच्या हद्दीला माहिम जंक्शन येथून सुरूवात होते. तानसा तलावात अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा धरणातील पाणी जमा होतं. 

'अशी' थांबवली जाते जलवाहिनीची दुरूस्ती

मुंबईला ७ तलावांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. तलावातील हे पाणी मुंबईकरांना मुख्य जलवाहिनीच्या माध्यमातून पुरवलं जातं. मात्र ही जलवाहिनी फुटल्यास हजारो ते लाखो लिटर पाणी वाया जातं. अशावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर टीका केली जाते. पण हेच पालिकेचे कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन जलवाहिनीची गळती थांबवतात.

एखादी जलवाहिनी फुटल्यास आधुनिक तंत्राच्या सहाय्यानं जलवाहिनी दुरूस्त केली जाते.

डी. जी. सेट (इलेक्ट्रीक सप्लाय) - सर्वप्रथम ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटलीये त्याठिकाणी डिझेल जनरेटींग सेटच्या (डी.जी.सेट) माध्यमातून इलेक्ट्रीक सप्लायची व्यवस्था केली जाते.

जेसीबी व फोकलॅंड - इलेक्ट्रीक सप्लायनंतर जलवाहिनी खोलवर असल्यास संबंधित परिसरात जेसीबी व फोकलॅंडच्या मदतीनं खड्डा खणला जातो.

लाकडाच्या खूटी - खड्डा खणल्यानंतर खड्ड्यात पाणी जमा झाल्यास पंपाच्या सहाय्यानं पाणी बाहेर काढलं जातं. त्यानंतर तात्पूरत्या स्वरूपात लाकडाच्या खूटी मारून गळती थांबवली जाते.

एअर प्लाझ्मा मशीन - जलवाहिनीची आतून गळती थांबवयची असल्यानं जलवाहिनीवर २ मॅनहोल तयार करणं गरजेचं असतं. त्यानुसार, एअर प्लाझ्मा मशीनच्या सहाय्यानं मॅनहोल तयार केले जातात.

हाय व्हॉल्यूम डिस्चार्ज पंप - मॅनहोल तयार केल्यानंतर हाय व्हॉल्यूम डिस्चार्ज पंपाद्वारे जलवाहिनीतील पाण्याचा उपसा करून तिला रिकामं केलं जात.

एम.एस शीट (पत्र्याची शीट) - जलवाहिनी रिकामी झाल्यावर पालिकेचे कर्मचारी जलवाहिनीत प्रवेश करतात व ज्या ठिकाणी गळती आहे, तिथे पत्र्याची शिट लावून गळती थांबवतात.

एअर ब्लोवर्स - जलवाहिनीत काम करत असताना कर्मचाऱ्यांना ऑक्सीजन मिळावं यासाठी एअर ब्लोवर्सच्या माध्यमातून ऑक्सीजनचा पुरवठा केला जातो.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा