Advertisement

इस्टर्न फ्री वेवर विद्युत दिवे, केबल्स जाळल्या; पालिका लावणार जनरेटर्स

पूर्व मुक्त मार्गावर सुमारे ८०० मीटर लांबीचा व स्वतंत्र दुहेरी मार्गिका असणारा वाहतूक बोगदा देखील आहे. या बोगद्यातील प्रकाश व्यवस्थेसाठी महापालिकेद्वारे विद्युत दिवे आणि विद्युत केबल बसविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी समाज-विघातक प्रवृत्तींद्वारे बोगद्यातील केबल पूर्णपणे जाळण्यात आली.

इस्टर्न फ्री वेवर विद्युत दिवे, केबल्स जाळल्या; पालिका लावणार जनरेटर्स
SHARES

चेंबूर ते दक्षिण मुंबई यांना जोडणाऱ्या पूर्व मुक्त मार्गावरील अर्थात इस्टर्न फ्री वेवरील पांजरापोळ येथील बोगद्यातील विद्युत केबल व दिवे जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे याप्रकरणी महापालिकेकडून पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वीजेच्या दिव्यांची व केबल्स जाळण्यात आल्यामुळे भुयारी मार्गात अंधार पसरलेला असून यासाठी विद्युत जनित्र अर्थात जनरेटरची व्यवस्था करून या भुयारी मार्गात प्रकाश व्यवस्था करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.


विद्युत दिवे, फिटींग्ज चोरल्या

महापालिकेच्या 'एम पूर्व' विभागाच्या हद्दीत पांजरापोळ परिसरात पूर्वमुक्त मार्गाचा काही भाग येतो. याच भागातील पूर्व मुक्त मार्गावर सुमारे ८०० मीटर लांबीचा व स्वतंत्र दुहेरी मार्गिका असणारा वाहतूक बोगदा देखील आहे. या बोगद्यातील प्रकाश व्यवस्थेसाठी महापालिकेद्वारे विद्युत दिवे आणि विद्युत केबल बसविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी समाज-विघातक प्रवृत्तींद्वारे बोगद्यातील केबल पूर्णपणे जाळण्यात आली. तसेच, विद्युत दिवे आणि फिटींग्ज चोरण्यात आल्या. त्यामुळे याबाबत महापालिकेकडून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती एम-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे. या बोगदा मार्गात यापूर्वी देखील अशा घटना घडल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.


२४ तासांत काम होणार पूर्ण

वाहनचालकांच्या सुविधेच्या व सुरक्षेच्या दृष्टीने बोगद्यातील प्रकाश व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. यासाठी सर्वप्रथम जनित्र-संच बसवून तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश व्यवस्था कार्यान्वित करण्यात येणार आहे. हे काम पुढील २४ तासात पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


पहिल्या टप्प्यात १२० एलईडी दिवे

यापूर्वी बोगद्यात केवळ ‘हाय पावर सोडिअम वेपर (एचपीएसव्ही) या प्रकारचे दिवे होते. मात्र आता पहिल्या टप्प्यात काही सोडिअम वेपर दिव्यांसह ‘एलईडी’ प्रकारचे १२० दिवे बसविण्यात येणार आहेत. बोगदा दुहेरी मार्गिकेचा असल्याने ६० दिवे एका बाजूला, तर दुस-या बाजूला ६० दिवे बसविण्यात येणार आहेत. तर दुस-या टप्प्यात सर्व दिवे 'एलईडी' प्रकारातील बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. हे काम पुढील २१ दिवसांत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.


चोरीच्या भीतीने केबल २० फूट उंचीवर

बोगद्यात यापूर्वी असणा-या विद्युत केबल या जमिनीलगत चर खोदून बसविण्यात आल्या होत्या. मात्र, बोगद्यात वारंवार घडणा-या केबल चोरीच्या किंवा केबल जाळण्याच्या घटना लक्षात घेऊन आता विद्युत केबल जमिनीपासून २० फूट उंचावर बसविण्यात येणार आहेत. तसेच, या बोगद्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने सध्याच्या विनाशस्त्र सुरक्षा रक्षकांऐवजी सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



हेही वाचा

मुंबईतील अनधिकृत बांधकामं होणार अधिकृत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा