
दिवा (Diva) येथील रहिवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शहराला स्वतंत्र पिन कोड 400611 अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची रहिवाशांची महत्त्वाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. यापूर्वी दिवा आणि मुंब्रा (Mumbra) या दोन्ही भागांसाठी 400612 हा एकच पिन कोड वापरला जात होता.
सामायिक पिन कोडमुळे दिव्यातील नागरिकांना पोस्ट वितरणात विलंब, सरकारी कागदपत्रे मिळण्यात अडचणी, बँकिंग व्यवहारातील चुका तसेच ऑनलाइन सेवांचा वापर करताना तांत्रिक अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते.
नवीन स्वतंत्र पिन कोड लागू झाल्यानंतर या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. टपाल आणि कुरिअर सेवा अधिक सुरळीत होण्यासोबतच दिव्याला स्वतंत्र प्रशासकीय आणि भौगोलिक ओळख मिळणार आहे. त्यामुळे सरकारी योजना, ऑनलाइन व्हेरिफिकेशन प्रक्रिया आणि खासगी डिजिटल सेवांमध्ये होणारा गोंधळही कमी होणार आहे.
या निर्णयामागे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. जागो हो दिवाकर Jago Ho Divekar या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्थानिक नेते विजय भोईर Vijay Bhoir यांच्या नेतृत्वाखाली हा मुद्दा सातत्याने प्रशासनासमोर मांडण्यात आला.
विजय भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केंद्र सरकार, टपाल विभाग आणि विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिसमध्ये वरिष्ठ टपाल अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन दिवेकरांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या.
या आंदोलनाला स्थानिक राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळाला. संजय केळकर (Sanjay Kelkar) आणि निरंजन दवेकर (Niranjan Davkhare) यांनी विविध सरकारी स्तरांवर हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. तर माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahasrabuddhe) यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून स्वतंत्र पोस्टल झोनची गरज अधोरेखित केली.
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आणि ठाणे टपाल विभागाच्या विविध पाहणीनंतर अखेर टपाल विभागाने दिव्यासाठी 400611 हा स्वतंत्र पिन कोड मंजूर करून लागू केला आहे.
हेही वाचा
