
राज्यात (maharashtra) मोटार वाहनांच्या वायू प्रदूषण तपासणीसाठी आकारण्यात येणाऱ्या वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) शुल्काच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे.
परिवहन विभागाने सुधारित दरांना मंजुरी दिली आहे. राज्यातील सर्व वायू प्रदूषण नियंत्रण (Air pollution control) केंद्रांना हे शुल्क आकारणे बंधनकारक केले आहे.
महाराष्ट्र राज्य पीयूसी केंद्र मालक संघटनेने पीयूसी शुल्कात वाढ करण्याची मागणी केली होती. या मागणीचा अभ्यास करण्यासाठी परिवहन विभागाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली.
समितीने, इतर राज्यांमधील सध्याचे पीयूसी तपासणी दर (Charges) आणि विविध घटकांचा अभ्यास करून, दरवाढीबाबत एक अहवाल सादर केला.
सुधारित दरांनुसार, पीयूसी तपासणी शुल्क दुचाकींसाठी 50 रुपयांवरून 60 रुपये, पेट्रोलवर चालणाऱ्या तीनचाकींसाठी 100 रुपयांवरून 120 रुपये, पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजी वाहनांसाठी 125 रुपयांवरून 150 रुपये आणि डिझेल वाहनांसाठी 150 रुपयांवरून 180 रुपये करण्यात आले आहे.
सर्व वायू प्रदूषण नियंत्रण केंद्र मालकांना त्यांच्या केंद्रांसमोर सुधारित शुल्कासंबंधी सूचना ठळकपणे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व पीयूसी केंद्रांवर सुधारित दरांची अंमलबजावणी होईल आणि विहित दरांपेक्षा जास्त शुल्क आकारले जाणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
परिवहन विभागाने एअर स्पीड टीमलाही या संदर्भात आवश्यक सूचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा
