Advertisement

भिवंडीतील ३० मुलांना जेवणातून विषबाधा, नायर रुग्णालयात दाखल


भिवंडीतील ३० मुलांना जेवणातून विषबाधा, नायर रुग्णालयात दाखल
SHARES

भिवंडीतील दारूल उलूम मदरशातील ३० मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांना बुधवारी उशीरा रात्री मुंबई सेंट्रलच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या ३० पैकी २८ जाणांवर नायर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.



प्रकरण काय?

भिवंडीतील दर्गारोड भागात मेहबूब कंपाऊंड येथील मुस्लिम धर्मियांच्या अव्वल महिन्याच्या निमित्ताने मंगळवारी रात्री 'नियाज दावत' हा सार्वजनिक जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या 'दावत'मध्ये परिसरातील १ हजार ते दीड हजार लहान मुले जेवायला आली होती. त्यामध्ये जवळच्याच दारूल उलूम मदरशातील ३० मुलांनाही जेवणाचं आमंत्रण होतं.



प्रकृती स्थिर

या 'दावत'मध्ये बिर्याणी खाल्ल्यावर मंगळवारी संध्याकाळी या ३० मुलांना उलटी, जुलाब आणि चक्कर येऊ लागली. त्यांच्यावर त्वरीत स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात नेण्यात आलं. यापैकी काही मुलांना ताप आणि आकडीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना बुधवारी रात्री तात्काळ मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ३० जणांपैकी २ जणांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं. तर २८ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. त्यातील २१ जण १८ वर्षांवरील असून ७ जण १८ वर्षांखालील आहेत.  


बुधवारी रात्री जेवणातून विषबाधा झालेली तीसही मुले ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात दाखल होती. परंतु त्यांच्या पालकांना त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवायचं असल्याने रात्री आम्हाला यासंदर्भात फोनवरून सूचना मिळाली. त्यानुसार आम्ही त्यांच्यावरील उपचाराची तयारी करून ठेवली होती. ३० पैकी २८ मुलांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं असून २१ जणांवर प्रौढांच्या सामान्य मेडिकल वाॅर्डमध्ये, तर ७ मुलांवर लहान मुलांच्या पेडियाट्रीक वाॅर्डमध्ये उपचार सुरू आहेत. या सर्वांना कुठल्या प्रकारची विषबाधा झाली, याचा तपास सुरू असून त्यानुसार उपचार करण्यात येत आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

- रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय 


सध्या सर्व मुलांवर उपचार सुरू असल्याची माहिती भिवंडी काँग्रेस शहर अध्यक्ष शोएब गुड्डू यांनी मुंबई लाइव्ह सोबत बोलताना दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा