Advertisement

मुंबईत करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये ३५ टक्क्यांनी घट

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

मुंबईत करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये ३५ टक्क्यांनी घट
SHARES

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईकरांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये बुधवारी ३५ टक्क्यांनी घट झाली असून, कोरोनाचे १४० रुग्ण सापडले आहेत. तसंच, २ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ११ दिवसांतील कोरोना रुग्णांचा हा सर्वात कमी आकडा आहे. गेल्या आठवड्यात या व्हायरसमुळे रोज ९ ते १६ रुग्णांचा मृत्यू होत होता.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेनं मागील ३ दिवसांपासून टेस्टिंगचं मापदंड बदलले असून, त्याचेच सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं समजतं. मुंबईत आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी ९ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या शुक्रवारपर्यंत मुंबईतील मृतांचा आकडा २ अंकी होता. परंतु, बुधवारी ही संख्या केवळ दोनवर आली आहे. मुंबईत एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिला मधुमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता. त्याशिवाय एका ५० वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यातली करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं.

बुधवारी राज्यात २३२ नवे रुग्ण सापडले. मंगळवारच्या तुलनेत हा आकडा ३४ टक्क्यानं कमी होता. त्याशिवाय दिवसभरात राज्यात ९ लोकांचा मृत्यू झाला. गेल्या ६ दिवसातील ही संख्याही सर्वात कमी आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढून २९१६ झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत १८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजला जाऊन आलेल्यांपैकी राज्यातील ५० लोकांना कोरोना झाला आहे. त्यात मुंबईतल्या १४ जणांचा समावेश आहे.

राज्यात रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठीही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. त्यानुसार केवळ एका दिवसात ७६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. संपर्कातून करोना बाधित झालेले आतापर्यंत ८५७ रुग्ण सापडले आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण सापडले तो परिसर आणि ते राहत असलेल्या ३३ हजार ६३६ इमारती आतापर्यंत सॅनिटाइज करण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा