Advertisement

सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन्सच्या देखभालीत लूट


सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन्सच्या देखभालीत लूट
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये बसवण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्सच्या देखभालीच्या नावाखाली कंत्राटदारांची लूट समोर येत आहे. इयत्ता ९वी ते १०वीच्या शालेय मुलींसाठी बसवण्यात आलेल्या १७२ सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन आणि सॅनिटरी बर्निंग मशिनच्या देखभालीसाठी चक्क प्रत्येकी साडेचार हजार रुपयांचा दर आकारत महापालिकेची तिजोरी लुटायला कंत्राटदार निघाले आहेत. प्रशासनाने यासाठी प्रत्येक मशिन १९०० रुपये असा दर निश्चित केलेला असताना त्यासाठी १३४ टक्के अधिक दराने देखभालीसाठी बोली लावत कंत्राट मिळवले आहे.


१७२ सॅनिटरी नॅपकिन मशिन्स

महापलिकेच्या माध्यमिक शाळेतील इयत्ता ९ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींकरता १५९ शालेय इमारतींमध्ये १७२ सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन आणि सॅनिटरी बर्निंग मशिन बसवण्यात आलेल्या आहेत. मागील वर्षी बसवण्यात आलेल्या या मशिन देखभालीचा हमी कंत्राट कालावधी मार्च २०१८ला संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी सॅनिटरी पॅड्सचा पुरवठा करणे, तसेच य मशिनची देखभाल करण्यासाठी महापालिकेने कंत्राटदाराची निवड केली आहे. यामध्ये दोन वर्षांसाठी ३४ लाख ८६ हजार सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करण्यात येणार आहे. या सॅनिटरी नॅपकिनसाठी मागील वेळी ३ रुपयांचा दर आकारण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा या सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा २.०७ पैशांमध्ये केला जाणार आहे. त्यामुळे दोन वर्षांसाठी सॅनिटरी नॅपकीन पुरवठ्यासाठी ७२ लाख १६ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.


फक्त देखभालीवर ३१ लाख रूपये खर्च!

मात्र, सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा करण्यासाठी दर कमी करणाऱ्या कंत्राटदारांनी सॅनिटरी व्हेंडिंग आणि बर्निंग मशिनच्या देखभालीसाठी प्रति मशीनकरता साडेचार हजार रुपयांची बोली लावली आहे. त्यामुळे या मशिनच्या देखभालीसाठी पुढील दोन वर्ष प्रत्येकी साडे पंधरा लाख रुपये याप्रमाणे ३१ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. मात्र, प्रशासनाने या देखभालीसाठी १९१५ रुपये प्रति मशिनचा दर निश्चित केला होता. त्यामुळे यासाठी साडेसहा लाखांप्रमाणे १३ लाखांमध्ये यासाठी बोली लागणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात यासाठी १३४ टक्के अधिक दराने बोली लावत १८ लाख दर आकारला आहे.


नव्या कोऱ्या मशिन्सला एवढी देखभाल हवीच कशाला?

या १७२ मशिन्स मागील वर्षी बसवण्यात आल्या असून त्या सर्व नवीन आहेत. त्यामुळे त्यासाठी देखभालीचा खर्च हा कमी असणे आवश्यक असतानाही केवळ कंत्राटदारांसाठी अधिकाऱ्यांनी त्यांना वाढीव दराने काम मिळवून देण्याचा प्रयत्न केला. उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी विभाग) राम धस यांच्याशी संपर्क साधला असता, या मशिनच्या देखभालीसाठी जास्त दराने कंत्राट दिले ही वस्तुस्थिती आहे. परंतु, या मशिनच्या देखभालीबाबत प्रशासनाला अनुभव नाही. प्रथमच या मशिन बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच कंत्राटदारांनी लावलेल्या बोलीनुसार जो कमी दर होता, त्यांना काम देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा