Advertisement

माथेरानसह 'या' चार जागांवर सुरू होणार रेस्टॉरंट ऑन व्हिल

माथेरानमध्ये मोठया संख्येने येणारे पर्यटक मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद घेतात.

माथेरानसह 'या' चार जागांवर सुरू होणार रेस्टॉरंट ऑन व्हिल
(File Image)
SHARES

मध्य रेल्वेने माथेरानमध्येही आकर्षक असे ‘चाकावरचे उपहारगृह’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जागेची पाहणी आणि अन्य कामे प्राथमिक स्तरावर सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

माथेरानमध्ये मोठया संख्येने येणारे पर्यटक मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद घेतात. ‘चाकावरचे उपहारगृह’ उपलब्ध झाल्यास त्यालाही पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे. माथेरानमध्ये या उपहारगृहासाठी जागेचा शोध सुरू आहे.

तसेच चिंचवड, आकुर्डी, मिरज आणि बारामती येथे ‘चाकावरील उपहारगृह’ सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच याबाबतच्या अन्य कामांना सुरूवात करण्यात आल्याचे मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

‘चाकावरच्या उपहारगृहा’साठी दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, लोणावळा, नेरळ, इगतपुरी स्थानकांच्या हद्दीत जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘चाकावरच्या उपहारगृहा’साठी पर्यटस्थळ असलेल्या माथेरानची निवड करण्यात आल्याचे सुतार यांनी सांगितले.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत. या ठिकाणी आरामात बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल असे उपहारगृह नसल्याने प्रवासी, पर्यटकांना रेल्वे स्थानकाबाहेरील हॉटेलवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे भारतीय रेल्वेने ‘चाकावरचे उपहारगृह’ ही संकल्पना अंमलात आणली.

रेल्वेच्या एका जुन्या वापरात नसलेल्या एक्स्प्रेस डब्याचे रूपांतर या उपहारगृहात करण्यात आले. या संकल्पनेतील पहिले ‘चाकावरील उपहारगृह’ ऑक्टोबर २०२१ मध्ये सीएसएमटी स्थानकात उभारण्यात आले. या स्थानकावरील फलाट क्रमांक १८ च्या बाहेरील आवारातच (पी. डीमेलो रोड) हे उपहारगृह उभे करण्यात आले.

उपहारगृहाचा डबा वातानुकूलित असून त्यात ४० जणांसाठी आसन व्यवस्था आहे. सीएसएमटी पाठोपाठ नागपूर स्थानकातही ‘चाकावरचे उपहारगृह’ सुरू करण्यात आले. या उपहारगृहांना चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सीएसएमटीमधील या उपहारगृहात सव्वालाख, तर नागपूरमधील उपहारगृहात दीड लाख व्यक्तींनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे.



हेही वाचा

मुंबईतल्या 'या' सहा स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर गगनाला भिडले

भारतीय रेल्वेचे नियम बदलले, आता दुसऱ्या व्यक्तीच्या तिकिटावर प्रवास करू शकता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा