पेंग्विनच्या विशेष कक्षाला तडे

अनेक वादांनंतर भायखळ्याच्या राणीबागेत पेंग्विन आणले गेले आणि मुंबईकरांच्या दर्शनासाठी ते खुले करण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा या पेंग्विन प्रकरणावरून वादाचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. राणीच्या बागेत हे पेंग्विन ज्या विशेष काचेच्या कक्षात ठेवण्यात आले आहेत, त्या कक्षाच्या आतल्या भिंतीला तडे गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पेंग्विनच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पेंग्विन आणि त्यावरून होणारे वाद मुंबईकरांना आता नवे राहिले नाहीत. पेंग्विनवादावरून अनेकदा पालिकेत सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेवर विरोधकांनी जोरदार टीकाही केली होती. पेंग्विनच्या मृत्यूमुळे तर उद्धव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली होती. या सगळ्यावर मात करत पुन्हा एकदा भायखळ्यातील राणीच्या बागेत करोडो रूपये खर्चून पेंग्विन आणले होते. याचे उद्घाटन मोठा गाजावाजा करत मार्च महिन्यात झाले. यासाठी सुमारे 25 कोटी इतका खर्चही करण्यात आला. मात्र महिन्याभरातच हे पेंग्विन जिथे ठेवण्यात आले आहेत त्या कक्षाच्या आतील भागातील दगडी भिंतीला भेगा पडल्या आहेत. 

या कक्षाचे काम हायवे कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. त्यामुळे हायवे कन्स्ट्रक्शनच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आणि वॉचडॉग फाऊंडेशनचे अध्यक्ष निकोलस अल्मेडा यांनी तडे गेल्याची बाब उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी या अधिकाऱ्यांनी असं काही नसल्याचे सांगितले. अल्मेडा यांनी याबाबत पालिकेला पत्रव्यवहार देखील केला. मात्र अखेर महिन्याभरात या कक्षातील दगडी भागाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेच्या आणि कंत्राटदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Loading Comments