Advertisement

धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर; ६ दिवस शून्य बाधित

धारावी पॅटर्नमुळं आशियातील या मोठ्या झोपडपट्टी कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला आहे.

धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर; ६ दिवस शून्य बाधित
SHARES

धारावी पॅटर्नमुळं आशियातील या मोठ्या झोपडपट्टी कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मागील ६ दिवस सलग इथं एकही बाधित रुग्ण सापडलेला नाही. तर मंगळवारी केवळ एका बाधित रुग्णाची नोंद झाली आहे.

सध्या धारावीत केवळ ११ सक्रिय रुग्ण असल्यानं हा परिसर कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. कोरोनाच्या विळख्यातून या विभागाला मुक्त करण्यासाठी महापालिकेनं घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत होती. अडीच चौरस किलोमीटर परिसरात वसलेल्या धारावीमध्ये ७ लाख लोकवस्ती आहे. दाटीवाटीनं वसलेल्या या लोकवस्तीत कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान होते. मात्र जास्तीजास्त लोकांची चाचणी, तात्काळ निदान, योग्य उपचार आणि नियमित निर्जंतुकीकरण हे सूत्र अवलंबिण्यात आले.

ऑक्टोबर २०२० मध्ये धारावीत कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटली. दुसऱ्या लाटेवेळी धारावीमधील इमारतींमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढली. त्यावेळेसही धारावी पॅटर्नचा प्रभाव कायम असल्याचं दिसून आलं.

कोविडचा नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर एक बाधित रुग्ण धारावीतील रहिवाशी असल्याचं समोर आलं. त्यामुळं पुन्हा चिंतेचं वातावरण पसरलं, मात्र सुदैवीनं या बाधित प्रवाशाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच त्याच्या संपर्कात असलेल्या २ व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने धारावीकरांना दिलासा मिळाला.

धारावीत ७ लाख नागरिक राहतात. यापैकी १८ वर्षांवरील साडेचार लाख नागरिक लस घेण्यास पात्र आहेत. यापैकी ५७ टक्के रहिवाशांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

या परिसरात कारखाने व छोटे-छोटे उद्योग असल्याने या ठिकाणी बाहेरुन येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. यापैकी अनेकांकडे त्यांचे आधारकार्ड नसते, अशावेळी त्यांना लस देणे अवघड ठरत आहे. मात्र १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी जी उत्तर विभागामार्फत घरोघरी जाऊन वंचित राहिलेल्या लोकांना डोस देण्यात येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा