Advertisement

तुमच्याशिवाय ‘हे’ शक्य नाही, महापालिकेची मुंबईकरांना साद

लाॅकडाऊनची भीती घालून देखील मुंबईतील गर्दी कमी होत नसल्याने महापालिकेने थेट मुंबईकरांनाच साद घातली आहे.

तुमच्याशिवाय ‘हे’ शक्य नाही, महापालिकेची मुंबईकरांना साद
SHARES

महाराष्ट्रासह मुंबईतील (mumbai) कोरोनाबाधितांचे आकडे दिवसागणिक वाढतच चालल्याने महापालिका प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण देखील वाढू लागला आहे. लाॅकडाऊनची भीती घालून देखील मुंबईतील गर्दी कमी होत नसल्याने महापालिकेने थेट मुंबईकरांनाच साद घातली आहे.

मुंबई महापालिकेने (bmc) आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करत मागील ३ महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या किती झपाट्याने वाढलीय याकडे मुंबईकरांचं लक्ष वेधलं आहे. महापालिकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “२०२१ची सुरुवात आरोग्यदायी संदेशाने झाली होती. ११ जानेवारीला मुंबईत केवळ २३९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. पण पुढच्याच महिन्यात ११ फेब्रुवारीला ६२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले, तर आता ११ मार्चला तब्बल १५०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. हा आलेख कोणत्या दिशेने जाईल, हे ठरवणं आपल्या हातात आहे. या विषाणूला मुंबईवर मात करण्यास देऊ नका. मुंबई, तुमच्याशिवाय आम्ही हे करू शकणार नाही”, अशा शब्दांत मुंबई महापालिकेने मुंबईकरांना साद घातली आहे.

हेही वाचा- उच्च वस्तीत राहणाऱ्यापेक्षा झोपडपट्टीवासियांमध्ये अधिक अँटिबॉडिज

मुंबईत शुक्रवारी १,६४६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ११२२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आणि ४ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ३,४०,२७७ इतकी असून सद्याच्या घडीला १२,४८७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ३,१५,३७९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ११,५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये ३० कंटेन्मेंट झोन असून २१४ इमारती महापालिकेने सील केल्या आहेत.

तसंच राज्यात शुक्रवारी कोरोनाचे (coronavirus) १५,८१७ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ५६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ११,३४४ रुग्ण बरे झाले आहेत.आतापर्यंत २१,१७,७४४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात ५२ हजार ७२३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यू दर २.३१ टक्के आहे. राज्यात आता १,१०,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२.७९ टक्के झालं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७३,१०,५८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,८२,१९१ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४२,६९३ व्यक्ती गृहविलगीकरणा मध्ये आहेत. तर ४ हजार ८८४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

(due to increasing coronavirus in mumbai bmc urges mumbaikars to take safety measures)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा