Advertisement

पाणीटंचाईमुळे ठाण्यात पाण्याचा काळाबाजार

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे गेली आहे. स्वमालकीचे धरण नसल्यामुळे पालिकेला विविध स्रोतांवर अवलंबून राहावे लागते.

पाणीटंचाईमुळे ठाण्यात पाण्याचा काळाबाजार
SHARES

ठाणे (thane) महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसापासून ठाणेकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणी टंचाईमुळे (water shortage) ठाणेकर अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.

त्यातच शहरात महापालिकेचे (thane municipal corporation) टँकर अपुरे पडत असल्याने खासगी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहेत. काही खासगी टँकरचालकांनी तिप्पट दर आकारले आहे.

गृहसंकुलांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. या टँकरद्वारे पुरवले जाणारे पाणी शुद्ध आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्येही संभ्रम आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे गेली आहे. स्वमालकीचे धरण नसल्यामुळे पालिकेला विविध स्रोतांवर अवलंबून राहावे लागते.

शहरासाठी दररोज सुमारे 621 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात 590 दशलक्ष लिटरच पाणीपुरवठा होत आहे. वाढती लोकसंख्या आणि मर्यादित पाणीपुरवठा यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत आहे.

दरवर्षी जानेवारी ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरणातील पाणीसाठा टिकवण्यासाठी पाणी कपात लागू केली जाते. यात एक दिवस पूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवून पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी दिले जाते.

जलवाहिनी फुटणे किंवा इतर तांत्रिक बिघाडांमुळेही पाणीपुरवठा वारंवार ठप्प होतो. परिणामी नागरिकांना सातत्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा (water supply) योजनेतील कल्याण फाटा येथील जलवाहिनी 10 दिवसांपूर्वी फुटली होती. जुनी आणि प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची ही जलवाहिनी तीन दिवसांनंतर दुरुस्त करण्यात आली.

मात्र, दुसऱ्याच ठिकाणी पुन्हा बिघाड झाल्याने शहरात पुढील चार दिवस 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली. आता ही पाणी कपात आणखी वाढवली आहे. त्यामुळे ठाणेकरांवर पाणी संकट कोसळले आहे.

गेल्या काही दिवसांत पालिकेने विविध भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला असून त्याच्या 550 हून अधिक फेऱ्या झाल्या आहेत.

महापालिकेचे टँकर कमी असल्याने अनेक गृहसंकुलांना खासगी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यानुसार या खासगी टँकरच्या फेऱ्या घोडबंदरसह इतर भागात वाढल्याचे चित्र आहे.

घोडबंदर भागातील अनेक गृहसंकुलांना दररोज तीन ते चार टँकर मागवावे लागत आहेत. यासाठी रोज 12 ते 13 हजार रुपयांचा खर्च येत असून तो रहिवाशांना परवडणारा नाही.

तरीही पाण्यासाठी अनेक संकुलांनी खासगी टँकरचालकांशी वार्षिक करार केले आहेत. नागरिकांना पाणी मिळत नाही, पण टँकरचालकांना मुबलक पाणी मिळते, असा आरोप करत पालिका प्रशासनावर टीका केली जात आहे.

महापालिकेकडून टंचाईग्रस्त भागांत विनामूल्य टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी दिवसाला एकच टँकर उपलब्ध होत असल्याने तो अपुरा ठरत आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकरकडे वळावे लागत आहे.




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा