Advertisement

लोअर परळच्या 'नवरंग स्टुडिओ'ला आग, अग्निशमन दलाचा १ कर्मचारी जखमी


लोअर परळच्या 'नवरंग स्टुडिओ'ला आग, अग्निशमन दलाचा १ कर्मचारी जखमी
SHARES

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं आगीचं सत्र अद्याप कायम आहे. कमला मिल दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा लोअर परळमध्ये आगीची घटना घडली. शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास लोअर परळ इथल्या नवरंग सिने स्टुडिओला लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. ही आग इतकी भयंकर होती की स्थानिक रहिवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. पण अग्निशमन दलाने वेळीच ही आग विझवत रहिवाशांना दिलासा दिला. आग विझवताना अग्निशमन दलाचा १ कर्मचारी किरकोळ जखमी झाला.



हा स्टुडिओ मागच्या १५ ते २० वर्षांपासून बंद हाेता. रात्री १ च्या सुमारास अचानक स्टुडिओच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली. हळुहळू ही आगीने संपूर्ण स्टुडिओचा ताबा घेतला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार स्टुडिओचं बांधकाम लाकडी असल्याने वाऱ्यामुळे आगीचा भडका वाढतच गेला. स्थानिकांनी त्वरीत अग्निशमन दलाला संपर्क केला.



आगीची वर्दी मिळताच अग्निशामन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. भडकलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला ३ तास शर्थीची झुंज द्यावी लागली. सुदैवाने आग लागलेली इमारत जुनी असल्यामुळे तसेच मागच्या काही वर्षांपासून बंद असल्यामुळे या दुर्घटनेत कुणीही स्थानिक जखमी जखमी झालं नसलं, तरी अग्निशमन दलाचा १ कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. आग कशी लागली याचं करण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी पुढील चौकशी पोलिस करत आहेत.



ही इमारत मागच्या २० वर्षांपासून बंद आहे. तरी अजूनही इमारतीत काही सामान पडून आहे. या सामानालाच ही आग लागल्याची शक्यता आहे. अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा