Advertisement

EXCLUSIVE : बोंबील ऑन डिमांड! ताजा म्हावरा तुमच्या दारात

“आधुनेकतेच्या काळात शहरे स्मार्ट होत आहेत. मग कोळीवाडा का स्मार्ट होऊ नये? या संकल्पनेला धरून आगरी-कोळी तरूणांनी बोंबील ऑन डिमांड अॅप काढलं आहे. आता लॉकडाऊनच्या काळात एका क्लिकवर मच्छी थेट तुमच्या दारात...

EXCLUSIVE : बोंबील ऑन डिमांड! ताजा म्हावरा तुमच्या दारात
EXCLUSIVE
SHARES

पापलेट, बोंबील, कोळंबी, सुरमई असा म्हावरा किती दिवस अनेकांच्या पोटोत गेला नसेल. खाण्याची इच्छा तर प्रत्येकाला होतच असेल. पण कसा खाणार? कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लॉकडाऊन (Lockdown) आहे. बाहेर मार्केटमध्ये जाऊन कोण एवढी रिस्क घेणार? हा विचार अनेकांच्या मनात डोकावत असेल. मग काय? पापलेट किंवा सुरमई फ्राय आणि कोलंबीचा रस्सा सोबतीला भाकरी, भात हा अस्सल खाण्याचा बेत काश्यात गुंडाळायचा आणि कडेला ठेवायचा. साध्या-सुध्या जेवणावर काय ते समाधान मानायचं.


पण मस्यप्रेमींची (Seafood Lover) होणारी घुसमट पाहता काही तरूणांनी एका क्लिकवर म्हावरा तुमच्या घरी पोहोचवण्यासाठी एक अॅप सुरू केलं आहे. या अॅपद्वारे ताजी, स्वच्छ आणि स्वस्त मासळी एका क्लिकवर घरपोच पोहचणार आहे.


काय आहे हे अॅप?

आगरी-कोळी काही तरुणांनी एकत्र येत 'बोंबील ऑन डिमांड' (Bombil : On Demand) नावाचं अॅप सुरू केलं आहे. थेट बोटीवरून आलेले ताजे मासे आपल्याला घरपोच मिळणार आहेत. अॅपचं नाव जरी बोंबील असलं तरी सागर, खाडीतील सर्व प्रकारची मासळी मिळणार आहे. कोलंबी, खेकडे, सुरमई, पापलेट, बांगडा, अगदी सुखी मासळी सुद्धा असे बरेच प्रकार तुम्ही ऑर्डर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त गुगल प्ले स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करायचं आहे.


आगरी-कोळी विक्रेत्यांना प्राधान्य

या अॅपद्वारे केवळ आगरी-कोळी समाजातील बांधवांचीच विक्रेते म्हणून निवड करण्यात आली आहे. जेणेकरून आगरी-कोळी समाजाचा प्रभाव ज्या भागात आहे तिथल्याच मत्स्य विक्रेत्यांना एक संधी किंवा व्यासपीठ उपलब्ध व्हावं. या अॅपसाठी जवळपास ६५० मच्छीविक्रेत्यांनी नोंदणी अर्ज केले होते. पण सध्या कोरोनाचा सावट पाहता तूर्तास त्यातल्या १५० विक्रेत्यांना ट्रेनिंग देऊन मैदानात उतरवण्यात आलं आहे.

पालघरमधील सफाळ्यापासून ते सायन, मालाड, मनोरी, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरपर्यंतचे विक्रेते नोंदणी झाले आहेत. नवी मुंबईत उरणपर्यंत काही विक्रेत्यांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या विक्रेत्यांच्या माध्यमातून घरपोच मच्छी मिळणार आहे. त्या-त्या परिसरातील विक्रेते हे त्यांच्या ५ किलोमीटर अंतरात येणाऱ्यांना घरपोच डिलिव्हरी करतील. अंदाजे ३० ते ४० मिनिटांच्या आता तुम्हाला ताजे मासे घरपोच केले जातील.      


कोळी बांधवांच्या गळचेपीला रोक

“जिथे मासे विक्री होते तिथल्या बंदरांवर आज कोळी बांधवांची गळचेपी केली जाते. बऱ्याचश्या परप्रांतीयांमुळे या भूमिपुत्रांवर अन्याय केला जातो. त्यामुळे आम्ही या अॅपची अशी डिझाईन केली जेणेकरून बोटीवरील ताजी मच्छी थेट तुमच्या घरी पोहोचवली जाईल. यामुळे मच्छिमारी करणारा कोळी बांधव थेट तुमच्याशी जोडला जाईल.”

योगेश पाटील, सदस्य, बोंबील अॅप


सोशल डिस्टंसिंगचं पालन

कोरोनाव्हायरसमुळे सध्या भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे अॅपद्वारे घरपोच मासळी पुरवणाऱ्या विक्रेत्यांना सोशल डिस्टंसिंगद्वारे नियम पाळण्याचे आदेश दिलेले आहेत. मच्छी पॅक करताना हातात ग्लोज, तोंडावर मास्क सक्तीचं केलं आहे. विक्रेत्यांच्या जवळ सॅनिटायझर देखील आवश्यक आहे. याशिवाय कॅश पेमेंट त्यांच्याकडे स्वीकारलं जात नाही. तर फक्त ऑनलाईन पेमेंटची सोय करण्यात आली आहे. कमीत कमी कॉन्टॅक होईल याची पूर्ण खबरदारी घेतली जाते.


कोणाची संकल्पना?

मुळचे अलिबाग इथले नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांच्या संकल्पनेतून सागरी मच्छिमारांसाठी हे अॅप तयार करण्यात आलं आहे. रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर इथल्या सागरी मच्छिमारांची सहकार चळवळ उभी करण्याचा यामागचा हेतू आहे. फक्त एवढंच नाही तर आधुनेकतेच्या काळात शहरे स्मार्ट होत असताना आपले कोळीवाडे स्मार्ट करण्याच्या उद्देशानं बोंबील अॅपची निर्मिती करण्यात आली.  


बोंबीलच्या या सामाजिक प्रकल्पात प्रणित पाटील यांनी इतर तरुणांची देखील साथ मिळाली. विनोद खारिक, सुशांत म्हात्रे, भूषण तांडेल यांच्यावर तंत्रज्ञान हाताळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. समाजातील लोकांमध्ये या चळवळीची जनजागृती करण्यासाठी योगेश पाटील, स्वप्नील पाटील यांनी पुढाकार घेतला. तर या संकल्पनेशी अधिक  कोळणींना जोडण्यासाठी मच्छिमार आणि वितरक गणेश नाखवा यांनी देखील हातभार लावला.


कोळीवाडा स्मार्ट करण्याचा प्रयत्न

आधुनेकतेच्या काळात शहरे स्मार्ट होत आहेत. मग कोळीवाडा का स्मार्ट होऊ नये? या संकल्पनेद्वारे कोळी महिलांना स्मार्ट बनवायचा आमचा हेतू आहे. मच्छी विक्री करणाऱ्या या कोळी महिलांनी एका जागी बसून मच्छी विकण्यापेक्षा त्यांनी स्मार्टफोनच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

खरंतर सकाळी उठल्यापासून ते मच्छी विकण्यापर्यंत कोळी महिलांची खूप दमछाक होते. यात त्यांना कित्येक आजार होतात. पण आमच्या या संकल्पनेमुळे त्या घरा-घरात पोहोचतील. कित्येक लोकं त्यांच्यापर्यंत पोहोचतील. कोळी महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या अॅपशी आता अनेक पुरुष विक्रेते देखील जोडले गेल्याचा आम्हाला आनंद आहे.”

योगेश पाटील, सदस्य, बोंबील अॅप


मत्स्यव्यवसायाला उभारणी

गेल्या एक वर्षापासून या अॅपवर काम देखील सुरू होतं. नेमकं कोरोनाव्हायरसचा धोका भारतात आला आणि अॅप लाँच करण्यात काही समस्या येऊ लागल्या. त्यात कोरोना व्हायरसचा मोठा फटका मत्स्य व्यवसायाला म्हणजेच आगरी-कोळी मच्छिमारांना बसायला लागला. मत्स्य व्यवसाय ठप्प झाल्यानं लोकांची गैरसोय होऊ लागली. हे सर्व परिस्थिती पाहता अखेर ऑनलाईनच आम्ही बोंबील अॅपचा श्रीगणेशा केला.


लोकांचा चांगला प्रतिसाद

६ मे रोजी हे अॅप लाँच करण्यात आलं. पहिल्याच दिवशी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेले काही दिवस फ्रोजन मच्छी बाजारात विक्रीला होती. ज्याची चव इतकी चांगली नव्हती. त्यामुळे जवळपास लॉकडाऊनमध्ये ३०-४० दिवसानंतर लोकांना ताजी मच्छी उपलब्ध झाली. अनेक गिऱ्हाईकांनी फोन करून त्यांचं कौतुक केलं. ताजी आणि स्वच्छ मच्छी गिऱ्हाईकांपर्यंत पोहचवू शकलो याचा आनंद असल्याच्या भावना योगेश पाटील यांनी व्यक्त केल्या. पण याशिवायच सध्या कोरोनामुळे लिमिटेड ऑफर घेत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.      



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा