Advertisement

पुनर्विकासाऐवजी पुन्हा दुरुस्तीच... महापालिकेच्या मंडयांना बकाल बनवतंय तरी कोण?


पुनर्विकासाऐवजी पुन्हा दुरुस्तीच... महापालिकेच्या मंडयांना बकाल बनवतंय तरी कोण?
SHARES

मुंबई महापालिकेच्या तब्बल 43 मंड्यांचा पुनर्विकास करून विकास करण्यात येणार असल्याचे सांगत मागील दहा वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडून केवळ गाजर दाखवले जात आहेत. दहा वर्षात विकासाअभावी बकाल होऊन मंड्या सडल्या. मात्र, आता या सर्व मंड्यांच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव रद्द करून त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने पुनर्विकास केला जात असल्याचे सांगणाऱ्या महापालिका प्रशासनाने हा प्रस्तावच गुंडाळून ठेवत पुन्हा एकदा दुरुस्तीची मलमपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत महापालिकेच्या एकूण 91 मंडया असून, त्यातील 18 मंड्यांच्या पुनर्विकासासाठी देकारपत्र देण्यात आले होते. यातील केवळ मुलुंड पश्चिम येथील संत जलाराम बाप्पा मंडई, घाटकोपरमधील हिराचंद देसाई मंडई आणि सांताक्रुझ वाकोला मंडई या तीन मंड्यांचा पुनर्विकास पूर्ण झाला आहे. कलिनासह अन्य काही मंडईंच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. तर काहींचे श्रीफळही वाढवले गेलेले नाही. मात्र, या व्यतिरिक्त ज्या 25 मंड्यांचे परिशिष्ट दोन बनवून पुनर्विकासाचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते, तेही परिशिष्ट दोन न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करून त्यांचा पुनर्विकास महापालिकेच्या वतीने करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर पुनर्विकास न झालेल्या 18 मंड्यांपैकीही काही मंड्यांचे प्रस्ताव रद्द करून त्यांचाही पुनर्विकास महापालिकेच्या वतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या 18 मंड्यांपैकी गोपी टँक मंडई, दादर पश्चिममधील क्रांतीसिंह नाना पाटील मंडई, नळ बाजारमधील मिर्झा गालिब मार्केट, यापैकी 5 मंडयांमध्ये गाळेधारकांच्या आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन वैशिष्ट्यपूर्ण सुधारणा आणि आवश्यकतेनुसार पुनर्रचना करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने नुकताच घेतला आहे. यामध्ये माहिमचे सुप्रसिद्ध गोपी टँक मार्केट, दादरच्या प्लाझा चित्रपट गृहाजवळील क्रांतीसिंह नाना पाटील मार्केट, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई, नळ बाजार परिसरातील मिर्जा गालिब मार्केट आणि ग्रँट रोडचे लोकमान्य टिळक मार्केट आदी मंडईंचा पुनर्विकास करण्याऐवजी आता या सर्व मंडईंची दुरुस्तीच केली जाणार आहे.

महापालिकेच्या बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी 'आवश्यक असलेल्या मंडईंचाच पुनर्विकास केला जाईल,' असे स्पष्ट केले आहे. या पाच मंडईंच्या विकासासाठी 4 कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्यातून मंडईंची दुरुस्ती आणि पुनर्रचना केली जाणार आहे. क्रॉफर्ड मार्केटच्या धर्तीवर या सर्व मंडईंची डागडुजी करून त्या उंच केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

या पाचही मंडयांमध्ये सुधारणा करताना मंडईंचे अंतर्गत आणि बाह्य स्वरुप हे पारंपारिकता व आकर्षकता जपणारे असेल याची काळजी घेण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने मंडईंचे प्रवेशद्वार हे आकर्षक असण्यासोबतच तात्काळ ओळखता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. याशिवाय मंडईंच्या आतील भागात ओटले(ओटा), गाळेधाकरांना सामान ठेवायची जागा इत्यादी बाबी देखील पारंपारिक स्वरुपाच्या आणि एकसारख्या राहतील याची दक्षता घेतली जाणार असल्याचे कुऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.

पाच वर्षांपूर्वी मंडईंच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी 60 लाखांची तरतूद करण्यात आली होती. परंतु पुनर्विकासाअभावी ना मंडईंचा विकास केला जात होता, ना त्यांची दुरूस्ती केली जात होती. त्यामुळे अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन मंडईंची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्याचे आदेश आपल्या पक्षाला दिले होते. त्यानुसार चकाचक मंडईची संकल्पना राबवून मंडईंचे प्रवेशद्वार आकर्षक बनवून, लाद्या लावून मंडईंना चकाचक बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता. यामध्ये गोपी टँक मंडईंचीही दुरूस्ती केली होती. परंतु आता पुन्हा एकदा दुरूस्तीच करून मंडईंच्या बकालपणावर मलमपट्टी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा