SHARE

मुंबई - नालेसफाईच्या कामामधील भ्रष्टाचार बाहेर आल्यानंतर चौकशी समितीने नोंदवलेला निष्कर्ष खरा ठरला. नालेसफाईतील गाळ टाकण्याच्या नावाखाली चक्क दगडविटांचे डेब्रीजच टाकले असल्याचे स्थायी समिती सदस्यांना आढळून आले आहे. विशेष म्हणजे डेब्रीजच्या नोंदीत आणि वजन काट्यांच्या पावत्यांमध्येही मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली असल्यामुळे नालेसफाईतील भ्रष्टाचार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

रस्त्यालगतच्या नाल्यांतील गाळ वाहून नेण्यासाठी वाहने आणि यंत्रसामुग्री भाड्याने घेणे आणि गाळाची विल्हेवाट लावणे याबाबतचा प्रस्ताव मागील आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीला आला. त्यावेळी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी ज्या ठिकाणी गाळ टाकला जातो, तेथील जागेची प्रत्यक्ष पाहणी केली जावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे नाल्यातील काढलेला गाळ आणि त्याचे प्रमाण आणि विल्हेवाटीचे ठिकाण याची महापे येथील घटनास्थळी जावून स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्यासह सदस्यांनी पाहणी दौरा केला.

या पाहणीत ज्या ठिकाणी गाळ टाकला जातो, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत. सध्या टाकल्या जात असलेल्या रॅबिटच्या वजनात आणि वजनकाट्याच्या पावत्यांमध्ये मोठा फरक आढळून आला आहे. गाळ टाकला जाणार होता, त्याठिकाणी सध्या रॅबिट टाकले जात आहे. तसेच त्या ‌ठिकाणी गाड्यांच्या वेळापत्रकातही तफावत आढळून आली आणि रॅबिटच्या वजनातही फरक दिसून आला. याशिवाय वजन काट्याच्या पावत्यांमध्ये मोठी तफावत आढळून आली. सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नव्हते तसेच व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमबद्दल शंका उपस्थित करण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी दिली. 

रॅबिट टाकताना जर एवढा घोळ होत असेल तर गाळ टाकताना काय होईल? असा सवाल कोरगावकर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केला. गाळ टाकण्याच्या जागी सुरू असलेल्या या घोळाचे स्पष्टीकरण स्थायी समिती सदस्यांनी पालिका प्रशासनाकडे मागितले आहे. त्याप्रमाणे पुढील स्थायी समितीच्या बैठकीत पालिका प्रशासन याबाबतचा अहवाल मांडणार आहे. या वेळी भाजपा गटनेते मनोज कोटक, माजी उपमहापौर अलका केरकर, नगरसेवक मंगेश सातमकर, सदानंद परब, चंगेझ मुलतानी, नगरसेविका राजेश्री शिरवाडकर, सुजाता सानप हे नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

सदस्यांना दिसून आलेल्या त्रुटी

  • वजन काट्याच्या पावत्यांमध्ये तफावत
  • सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीत
  • गाड्यांच्या वेळापत्रकात तफावत
  • रॅबिटच्या वजनामध्ये फरक
  • व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमबद्दल शंका
संबंधित विषय
ताज्या बातम्या