राणीच्या बागेत 'म्हातारीचा बूट', 'गेट वे ऑफ इंडिया'

मुंबईची ओळख असणाऱ्या वास्तू एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी मुंबईकरांना लवकरच मिळणार आहे.

SHARE

मुंबईची ओळख असणाऱ्या वास्तू एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी मुंबईकरांना लवकरच मिळणार आहे. 'म्हातारीचा बूट', 'भारतातील पहिली ट्राम', 'गेट वे ऑफ इंडिया', 'कापड गिरणी आणि त्यावरील चिमणी' याप्रमाणे अनेक वास्तू मुंबकरांना महापालिकेच्या वार्षिक उद्यान प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. भायखळा येथील राणीच्या बागेत हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

वार्षिक उद्यान प्रदर्शन

महापालिकेचं राणीबागेत वार्षिक उद्यान प्रदर्शन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यावेळी अनेक वास्तू या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणेज पानाफुलांपासून विविध आकर्षक कलाकृतींनी या वास्तू बनवल्या जाणार आहेत. तसंच, या वास्तू मुंबईकरांना आकर्षित कराव्या यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत.

रौप्यमहोत्सवी वर्ष

प्रदर्शनाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून त्याचं उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी दुपारी १२ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत तर १ व २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेदरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे.

खास आकर्षण

दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन पालिकेच्या उद्यान खात्यातर्फे हे प्रदर्शन भरवले जाते. पाना-फुलांपासून तयार केलेले अनेक 'सेल्फी पॉइंट' देखील यंदाच्या प्रदर्शनाचं खास आकर्षण असणार आहेत. यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. तसेच, कृष्णवडासारखी अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या