Advertisement

हँकॉक पूल मे महिन्यात होणार खुला?


हँकॉक पूल मे महिन्यात होणार खुला?
SHARES

ब्रिटिशकालीन हँकॉक पुलाच्या जागेवर नवा पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे येत्या नवीन वर्षातील मे महिन्याच्या अखेरीस काम पूर्ण होणार असून, नवा पूल नागरिकांच्या सेवेत रुजू करण्याचा पालिकेचा मानस आहे.

ब्रिटिशांनी भायखळा आणि सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान १८७९ मध्ये हँकॉक पूल उभारला. या पुलाची १९२३ मध्ये डागडुजी करण्यात आली होती. ब्रिटिशकालीन असल्यानं हा हँकॉक पूल धोकादायक बनला होता. परिणामी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेनं अवजड वाहतुकीसाठी हा पूल बंद केला. मात्र, रेल्वे प्रशासन आणि महापालिका यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे अनेक वर्षे या पुलाच्या पुनर्बाधणीला मुहूर्त सापडू शकला नव्हता. त्यावरून दुचाकी आणि लहान वाहनांची वाहतूक सुरूच होती. अखेर अत्यंत धोकादायक बनलेला हा पूल पालिकेने २०१६ मध्ये पाडून टाकला.

त्यानंतरही या पुलाच्या पुनर्बाधणीत अनेक शुक्लकाष्टे उभी राहिली होती. हँकॉक पुलाच्या पुनर्बाधणीसाठी पालिकेने निविदा प्रक्रियेअंती कंत्राटदाराची नियुक्ती केली. मात्र हा कंत्राटदार रस्ते घोटाळ्यात अडकल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर कंत्राट रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली. फेरनिविदा काढून नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. दरम्यानच्या काळात देशात वस्तू आणि सेवा कर लागू झाला. त्याचा परिणाम या कंत्राटावर झाला. या पुलासाठी तब्बल ६६० मेट्रिक टन वजनाचे गर्डर वापरण्यात येणार होते.

रेल्वे प्रशासनाने आयआयटी, पवई यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गर्डरचे आराखडे बदलण्याची सूचना केली. त्यामुळे १,३७४ मेट्रिक टन वजनाचे गर्डर बसविण्याचे निश्चित झाले. अन्य काही कामांमध्येही थोडे-फार फेरबदल करण्यात आले. चंदिगड येथील कारखान्यात या पुलाचा सांगाडा बेतण्याचे काम सुरू झाले. भलामोठा सांगाडा मुंबईत आणणे शक्य नव्हते. त्यामुळे सात भागांमध्ये तो विभागण्यात आला आणि तो मुंबईत रवाना झाला.

हँकॉक पुलाच्या मूळ जागेजवळच सुट्टे भाग जुळवून सांगाडा उभा करण्यात आला. हा सांगाडा मूळ जागेवर बसविण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि विशेष कुशल तंत्रज्ञांची आवश्यकता होती. करोनामुळे देशभरात लागू झालेल्या टाळेबंदीमुळे चंदिगड येथून तंत्रज्ञ मुंबईत येऊ शकले नाहीत. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल झाल्यानंतर हँकॉक पुलाच्या कामाने वेग घेतला आणि गर्डर मूळ ठिकाणी बसविण्याचे ५० टक्के काम पूर्ण झाले. आता उर्वरित ५० टक्के काम जलद गतीने करण्यात येत आहे.

उर्वरित ६५ मीटर लांबीचा गर्डर चंदिगड येथील कारखान्यात तयार आहे. तो सात भागांमध्ये विभागून मुंबईत आणण्यात येणार आहे. मार्चअखेरीस तो मुंबईत दाखल होईल आणि त्याची जोडणी आणि मूळ जागेवरील उभारणीचे काम मेअखेर पूर्ण होईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मेच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या पंधरवडय़ामध्ये या पुलाचे लोकार्पण होऊ शकेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा