बंदी असूनही बर्फाच्या गोळ्यांची विक्री सुरुच

Mumbai
बंदी असूनही बर्फाच्या गोळ्यांची विक्री सुरुच
बंदी असूनही बर्फाच्या गोळ्यांची विक्री सुरुच
See all
मुंबई  -  

काही दिवसांपूर्वीच महापालिकेने एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात स्टॉल्स, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बर्फांचे नमुने तपासण्यात आले. या तपासणीत बहुतांश बर्फात ई-कोलाय हा आरोग्यास घातक विषाणू आढळल्यानंतर महापालिकेने सर्व खाद्य पदार्थ आणि पेय पदार्थ विक्रेत्यांना दूषित बर्फाचा वापर करण्यास बंदी घातली. मात्र शाळा सुरू होताच पेय पदार्थ, बर्फाचे गोळे विकणारे विक्रेते शाळेच्या आवाराबाहेर सर्रासपणे दूषित बर्फाचा वापर करताना दिसून येत आहेत. महापालिकेच्या शिवडी क्रॉस रोड शाळेबाहेरही हेच चित्र असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई कधी करणार? असा प्रश्न पालक महापालिकेला विचारत आहेत.

शिवडीच्या क्रॉस रोड शाळा परिसरात दुपारच्या वेळेत बर्फाच्या गोळ्यांची विक्री केली जाते. बहुतांश विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ई-कोलाय विषाणूबाबत माहिती नसल्याने या गोळेवाल्याभोवती चांगलीच गर्दी होते. महापालिकेची कारवाई थंडावल्याने केवळ ही एकच शाळा नाही, तर शहरातील प्रत्येक शाळेसमोर आणि गल्लोगल्ली पुन्हा बर्फाचे गोळे, पेय पदार्थ विकणाऱ्यांनी दूषित बर्फ वापरण्यास सुरूवात केल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकेने मे महिन्यात अनेक ठिकाणच्या बर्फ विक्रेत्यांवर कारवाई केली होती. परंतु आता महापालिकेची कारवाई थंडावल्यानेच गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, शाळेबाहेर पुन्हा दूषित बर्फाचा वापर करुन खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येत आहे. महापालिकेने वेळीच याकडे लक्ष न दिल्यास पावसाळ्यात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे मत मनसेचे रस्ते आस्थापना सरचिटणीस मिलिंद पांचाळ यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात शिवडी, क्रॉस रोड येथील मनपा शाळा मुख्याध्यापक मेमूना लकडावाला यांच्याशी चर्चा केली असता शाळेच्या गेटवर गोळा विक्री करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात येईल. यासाठी महापालिका 'एफ' दक्षिण विभागासोबत पत्रव्यवहार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

बंदी असताना देखील दूषित बर्फाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई अंतर्गत नुकत्याच सात हातगाड्या जप्त केल्या आहेत. या हातगाड्यांमध्ये खाद्यपदार्थ व बर्फ विक्रेत्यांचा समावेश आहे. शिवडी येथील शाळेबाहेर बर्फाचे गोळे विकणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात येईल.
- विश्वास मोटे, सहायक आयुक्त, 'एफ' दक्षिण विभाग

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.