पुढच्या वर्षी मुंबईकरांना पाण्याचे 'नो टेन्शन'

  Mumbai
  पुढच्या वर्षी मुंबईकरांना पाण्याचे 'नो टेन्शन'
  मुंबई  -  

  अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गुरुवारपासून मुंबईतल्या अनेक भागांत पावसाची दमदार बॅटींग सुरू आहे. त्यामुळे धरण, तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी कमालिची वाढली आहे. वैतरणा नदीला तर पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना महापालिकेच्या जल अभियंता खात्याकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.


  मोडकसागर ओव्हरफ्लो

  मोडकसागर धरणाने जवळपास १५९.६३९ मि.टीएचडी एवढी पाण्याची पातळी गाठली असून पुढचे २४ तास असाच पाऊस राहिला तर मोडकसागर धरण 'ओव्हर फ्लो' होऊन वाहू लागेल, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

  पावसाने असाच जोर कायम ठेवला, तर महाराष्ट्रासह मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव, धरण ओसांडून वाहू लागतील. त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत मुंबईकरांना पाण्याची चिंता भेडसावणार नाही.


  २ ते ३ दिवस जोर राहणार

  तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून गुरुवारी मुंबईत बरसला. भारतीय हवामान शास्त्र विभागानेही १३ जुलै रोजी मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवला होता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर आणखी २ ते ३ दिवस राहण्याची शक्यता आहे़.

  विशेषत: गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरांत ठिकठिकाणी बरसलेल्या दमदार जलधारांनी उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांनाही दिलासा मिळाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यानेही यात भर घातली. येत्या ४८ तासांसाठी शहरासह उपनगरांत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

  दुपारचे काही क्षण वगळता शुक्रवारी दिवसभर नरिमन पॉइंट, कुलाबा, फोर्ट, भायखळा, गिरगाव, लालबाग, महालक्ष्मी, परळ, लोअर परळ, वरळी, माहीम, दादर, माटुंगा, वांदे-कुर्ला संकुल, कुर्ला, सायन, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, घाटकोपर, भांडुप, मुलुंडसह बोरीवली आणि गोरेगाव परिसरात जोरदार पाऊस झाला.

  कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरीता वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरांत काही ठिकाणी जोरदार पावसासह अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.


  तलावातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे :


  तलावाचे नाव
  पाणीसाठा (दशलक्ष लि.मध्ये)
  मोडकसागर
  ९४,४९६
  तानसा
  १,०५,०२८
  विहार
  ११,०७९
  तुलसी
  ३,८५०
  अप्पर वैतरणा
  ६४,४३१
  भातसा
  ३,२३,६१८
  मध्य वैतरणा
  १,८१,४९७  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

   
   
   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.