
ठाण्यातील बालकूम येथील त्रिमंदिरामध्ये होणाऱ्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी बालकूम–साकेत रस्त्यावर निर्बंध जाहीर केले आहेत.
30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत बालकूम नाका ते कळवा क्रिकेट नाका दरम्यानच्या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.
त्रिमंदिर येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या काळात आसपासच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मात्र रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने, ग्रीन कॉरिडॉरवरील वाहने तसेच जीवनावश्यक वायू वाहून नेणारी वाहने यांसह आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा
