अमेरिकेने एअर स्ट्राइकमध्ये इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांना ठार केलं होतं. आता इराणनं याचा बदला घेण्यास सुरूवात केली आहे. इराणनं इराकमधील अमेरिकेच्या सैन्य स्थळांवर एक डझन क्षेपणास्त्र डागली आहेत. आता तुम्ही म्हणाल याचं टेंशन कशाला घ्यायचं? आपल्या आयुष्यावर याचा काही परिणाम होणार नाही, असा तुमचा समज आहे. मग हा तुमचा गैरसमज आहे. कारण याच परिणाम इतर देशांप्रमाणे भारतावर देखील होणार आहे. या दोन्ही देशातील तणावामुळे भारतीयांच्या खिश्याला चांगलीच कात्री लागणार आहे. कंस ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्के तेल आयात करते. यातील बहुतांश तेल आखाती देशातून येते. कुवैत, इराक, संयुक्त अरब अमिरात सारख्या देशाकडून भारत तेल घेतो. हे तेल हर्मज खाडीतून येते. इराण लवकरच होर्मुझ जलमार्ग बंद करू शकतो. तेल व्यापारासाठी हा जलमार्ग महत्त्वाचा आहे. सध्या कच्चे तेल २.१२ डॉलर प्रति बॅरल वाढून ७२ डॉलर प्रति बॅरेल पार गेले आहे. संकट वाढल्यास पेट्रोलचे भाव प्रती लिटर ९० रुपये आणि डिझेलचे भाव ८५ रुपये लिटर पर्यंत पोहचू शकतात.
पेट्रोल - डिझेल महाग झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. यामुळे ट्रान्सपोर्ट सेवा महागू शकते. याचाच परिणाम म्हणजे भाज्या, फळं, दूध अशा वस्तूंच्या किंमती वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
येणाऱ्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक घसरू शकतो. डॉलरच्या तुलनेत रुपया १९ पैशांनी घसरून ७२.०२ वर गेला आहे. दोन्ही देशातील तणाव असाच कायम राहिला तर डॉलरच्या तुलनेत रुपया ७४ पर्यंत जाऊ शकतो.
येणाऱ्या काळात सोने ४४ हजारांपर्यंत जाऊ शकते. मागील काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू ओढवल्याने आखाती देशात तणाव वाढलाय. या पार्श्वभूमीवर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढलाय. त्यामुळे सोनं महाग झालंय.
विमान नियामक डीजीसीएनं सर्व विमान कंपन्यांना आखाती देशाचे हवाई मार्गांचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अमेरिका, युरोप, रशियाला जाणारी विमानं दुबईच्या मार्गावरून जाऊ शकणार नाहीत. विमानांना दुसरा मार्ग घ्यावा लागेल. यामुळे वेळ अधिक तर लागेलच आणि भाडेही वाढेल.
हेही वाचा