Advertisement

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगिती - ICJ


SHARES

नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालया (ICJ)ने अंतिम निर्णय येईपर्यंत कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधवबाबत भारताच्या बाजूने निर्णय दिल्याने याप्रकरणी भारताचा मोठा विजय झाल्याचे मानले जात आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. यासंदर्भात भारत आणि पाकिस्तानची बाजू ऐकून घेतल्यानंतर 'आयसीजे'ने गुरूवारी दुपारी आपला निर्णय दिला. 'आयसीजे'च्या 11 न्यायाधीशांच्या खंडपीठाने जाधव यांची अटक वादग्रस्त असल्याचे म्हटले.

निकालाची सुनावणी करताना 'आयसीजे'चे न्यायमूर्ती रॉनी अब्राहम म्हणाले की, भारताचा दावा हिएन्ना कराराअंतर्गत येतो. पाकिस्तानने भारताला कुलभूषण जाधव यांच्याशी कुठलाही संपर्क करू दिलेला नाही; हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केलेले आहे. कुलभूषण जाधव अद्याप हेर असल्याचे सिद्ध झालेले नाही. त्यांना कायदेशीर मदत मिळायला हवी. जोपर्यंत याप्रकरणी अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत जाधव यांच्या फाशीवर स्थगिती राहील.

मुंबईचे रहिवासी असलेले कुलभूषण जाधव आंतरराष्ट्रीय व्यापारी असून ते व्यापारानिमित्त इराणला गेले होते. तेथून जाधव यांचे अपहरण करून त्यांना पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आल्याचा भारताचा दावा आहे.

याप्रकरणी प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी भारताची बाजू आंतराष्ट्रीय न्यायालयात प्रभावीपणे मांडली. आंतराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयामुळे कुलभूषण जाधव यांच्या सुटकेच्या दृष्टीने भारताच्या प्रयत्नांना आता यश मिळू लागल्याचे दिसत आहे.

न्यायालयाच्या निकालाने कुटुंबीयांना दिलासा -
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाने मुंबईत राहणाऱ्या कुलभूषण यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. कुलभूषण यांचे बालपणाचे मित्र तुळशीदास पवार या निकालावर प्रतिक्रिया नाेंदवताना म्हणाले की, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही सगळे स्वागत करतो. या निकालाने मला व्यक्तीश: खूप आनंद झाला आहे. यातून कुलभूषण निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. आता कुलभूषण मुंबईत कधी परततो आणि त्याला मिठी कधी मारतो असे मला झाले आहे.

तत्पूर्वी कुलभूषण यांच्या बाजूने निकाल लागावा यासाठी त्यांच्या लोअर परळ येथील जुन्या घरी पूजा करण्यात आली. येथील लहानग्यांनी परिसरात स्वाक्षरी माेहीम देखील राबवली. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगिती दिली आहे. अंतिम निर्णय येईपर्यंत का होईना, पण कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने मुंबईकरांनी या निर्णयाचे स्वागत करत त्यांना फाशीची शिक्षा होऊ नये अशी मागणी केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा