Advertisement

मुंबई, ठाणेकरांना हवामान विभागाचा सतर्क राहण्याचा इशारा

हवामान विभागानं आधी जारी केलेला अलर्ट बदलून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे.

मुंबई, ठाणेकरांना हवामान विभागाचा सतर्क राहण्याचा इशारा
SHARES

मुंबईसह ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागानं आधी जारी केलेला अलर्ट बदलून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी मध्यरात्रीनंतर १२ वाजून ३२ मिनिटांनी एक तातडीचं ट्विट केलं आहे. 

'अत्यंत महत्त्वाचे' असं नमूद करत त्यांनी मुंबई आणि ठाणेकरांना सतर्क केले आहे. सॅटेलाइट आणि रडारनं टिपलेले ताजे चित्र लक्षात घेता उत्तर कोकणसाठी आधी जो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता त्यात बदल करण्यात येत आहे. मुंबई व ठाण्यासह संपर्ण उत्तर कोकणसाठी रेड अलर्ट जारी करण्यात येत आहे. नागरिकांनी या काळात जास्तीत जास्त सतर्कता बाळगावी, असे होसाळीकर यांनी या ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यामुळे सर्वांचीच झोप उडाली आहे. हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबई व ठाणेकरांवर मोठे संकट घोंगावू लागले आहे.

पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मुंबई व ठाण्यात पालिकेचे आपत्कालीन विभाग स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा