रस्त्याच्या कामाचा पत्ता नाही, पण झाडांची कत्तल मात्र जोरात

Andheri
रस्त्याच्या कामाचा पत्ता नाही, पण झाडांची कत्तल मात्र जोरात
रस्त्याच्या कामाचा पत्ता नाही, पण झाडांची कत्तल मात्र जोरात
रस्त्याच्या कामाचा पत्ता नाही, पण झाडांची कत्तल मात्र जोरात
See all
मुंबई  -  

एकीकडे मेट्रोसाठी बेसुमार झाडांची कत्तल केली जाणार असतानाच दुसरीकडे मुंबई महानगरपालिकाही झाडांच्या मुळावर उठली आहे. अंधेरी (पू) येथील ओल्ड नगरदास रोडवरील 34 झाडांच्या कत्तलीचा घाट घातला गेला आहे आणि तोही बेकायदा. पालिकेने आणि वृक्ष प्राधिकरणाने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ही 34 झाडे तोडण्यासाठी परवानगी दिली आहे. पण प्रत्यक्षात रस्त्याचे काम कुठेही सुरू नसताना झाडांच्या कत्तलीसाठी कंत्राटदार मात्र रस्त्यावर उतरला आहे. रस्त्याचे काम सुरू नसताना झाडांची कत्तल कशी केली? असा सवाल करत ओल्ड नगरदास रोडवरील दुकानदार आणि रहिवाशांनी कंत्राटदाराला झाडे कापण्यापासून रोखले आहे. तर कोणत्याही परिस्थितीत झाडांचा बळी जाऊ दिला जाणार नाही असा निर्धारही व्यक्त केला आहे.

ओल्ड नगरदास रोडवर झाडे कापली जात असल्याने स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांनी कंत्राटदाराला रोखले. तेव्हा कंत्राटदारांने आपल्याकडे सर्व आवश्यक त्या परवानग्या असून रस्ता रुंदीकरणासाठी झाडे कापली जात असल्याचे सांगितले.

रस्ता रुंदीकरणाचे कामच येथे सुरू नाही, काम सुरू करण्याची कोणतीही प्रक्रिया सुरू नाही, असे असताना झाडेच का आधी कापली जात आहेत? 

- उमा मोदी, स्थानिक रहिवासी

तर सेव्ह ट्रीच्या सदस्यांनी त्वरीत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करत कंत्राटदाराला आल्या पावली परत जाण्यास भाग पाडल्याची माहितीही उमा मोदी यांनी दिली आहे.

सोमवारी 10 एप्रिलला सकाळी 11 वाजता झाडे कापण्याचे काम पुन्हा सुरू करणार असल्याचं पालिका आणि कंत्राटदारांकडून सांगण्यात आले. मुळात कंत्राटदाराकडील परवानगीनुसार झाडांची कत्तल न करता ही झाडे काढून दुसरीकडे लावण्यात येणार आहेत. पण प्रत्यक्षात मात्र तीन झाडांची कत्तल शनिवारी केली असून आता या मेलेल्या झाडांचे पुनर्रोपन कसे करणार असाही प्रश्न उमा मोदींसह स्थानिक रहिवाशांनी विचारला आहे. तर पालिकेच्या या बेजबाबदार कृतीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता कंत्राटदार आणि पालिकेचे अधिकारी झाडे कापण्यास आल्यास चिपको आंदोलन करण्याची तयारी स्थानिकांनी दर्शवली आहे. 

दरम्यान, पालिकेचे के पूर्व विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर ट्री झोन 3 चे उप अधीक्षक प्रवीण गोस्वामी यांनी याविषयी पालिकेशी संपर्क साधा असे म्हणत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.