Advertisement

देशात धर्मांधता वाढली - कन्हैया कुमार


देशात धर्मांधता वाढली - कन्हैया कुमार
SHARES

'देशात धर्मांधता हा चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येक गोष्टीत फूट पाडली जात आहे. सध्या हिंसा रोजच्या जगण्यातील भाग झाला आहे. 'मार्क्सवादी, आंबेडकरवादी आणि प्रगतीशील समतावादी विचारधारांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे सर्वांनी एकजूट व्हायला हवं. हीच क्रांती आहे. आपणच आपल्याला घालून दिलेल्या मर्यादेतून बाहेर पडायला हवं तेव्हाच आपण एकत्र येऊ आणि धर्मांधतेला लढा देऊ शकू', असं मत विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने व्यक्त केलं. 

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या ‘मुंबई कलेक्टिव्ह’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात कन्हैया कुमार बोलत होता.विभिन्नतेत खरं सौंदर्य

'सध्या देशात सत्तेचं केंद्रीकरण झालं आहे. तुमच्या जीवनमरणाचं प्रश्न अवाजवी ठरवलं जात आहे. सध्या माणसामाणसांमधील विभिन्नताही अधोरेखित केली जात आहे. काहीच समान नसतं, हा भौतिक शास्त्राचा सिद्धांत मानवतेला लावला जात आहे. त्यामुळे उद्या असमानतेच्या आधारे लोकांना मारायचं ठरवलं तर कोणाकोणाला माराल? आई-पत्नीही कोणीही एकसारखं दिसत नाही. त्यांनाही मारायचं का? असा प्रश्न त्याने यावेळी उपस्थित केला. 


एकता निर्माण झालीच पाहिजे

भाषा, शरीर आणि जातीनं आपण सर्वच एकमेकांपासून विभिन्न आहोत आणि ही विभिन्नताच आपलं सौंदर्य आहे. तीच आपल्याला मनुष्य बनवते. या विभिन्नतेला एकतेत परावर्तित करायला हवं. कोणी आंबेडकरवादी, कोणी मार्क्सवादी, कोणी लेनिनवादी असेल किंवा आणखी कोणी समाजवादी असेल, आपण कोणत्याही विचारधारेचे असलो तरी आपल्यात एकता निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी आपण एका मंचावर यायला हवं', असे आवाहन त्यानं केलं आहे.

'आज आपल्या काळातील आंबेडकर, गांधींची गरज आहे. आपल्या काळातील भगतसिंग आणि सावित्रीबाई फुलेंचीही गरज आहे. त्यांना आपल्यातच शोधावं लागेल' असंही तो म्हणाला.


सामाजिक प्रश्नांवर लढण्याची व्यक्त केली गरज

'भारत सिव्हील वॉरच्या दिशेनं जात आहे. हे आपल्याला मोठ्या स्वरुपात दिसत नाही. मात्र या सिव्हील वॉरचा धोका नाकारता येत नाही. दंगलीही आता मोठ्या शहरापर्यंत मर्यादित राहिल्या नाहीत. त्या घरांपर्यंत आल्या आहेत. घरातील डिनर टेबलची दोन भागात वाटणी झाली आहे. बाप धर्मनिरपेक्षतेवर बोलत असेल तर मुलगा बापाला पाकिस्तान धार्जिणा ठरवत आहे. घर आणि गावात भेदाभेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. मुस्लीम वस्त्यांना मिनी पाकिस्तान ठरवलं जातं. हे सिव्हील वॉरचं द्योतक नाही तर काय आहे?' असा प्रश्न त्याने यावेळी उपस्थित केला. 

'सामाजिक सद्भाव, हीच सामाजिक संवेदना आणि एकता आपल्याला वाचवू शकते. सामाजिक प्रश्नावर केवळ आंबेडकरवादी आणि डावेच लढत अाहेत', असंही तो म्हणाला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा