Advertisement

टेक्सटाईल्स म्युझियमचे घोंगडे भिजतच


टेक्सटाईल्स म्युझियमचे घोंगडे भिजतच
SHARES

काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या टेक्स्टाईल म्युझियमचे घोंगडे अद्याप भिजतच पडले आहे. मागील दहा वर्षांपासून केवळ टेक्सटाईल म्युझियमची चर्चाच होत असून, आता याला गती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. म्युझियमसाठी संकल्पचित्र आणि अहवाल तयार करण्यासाठी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट या संस्थेची नियुक्ती करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात हे म्युझियमचे काम केव्हा सुरु होणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईतील गिरण संस्कृती बंद झाल्यानंतर गिरण्यांच्या जागेवर चिमण्या शिल्लक राहिल्या असून, या थडग्यांच्या जागांवर आता टोलंजंग व्यापारी संकूल व मॉल्स उभे राहत आहेत. त्यामुळे गिरण्यांची संस्कृती भावी पिढीला माहिती व्हावी म्हणून राज्य सरकारने इंडिया युनायटेड मिल्स 2 व 3 च्या 61056.89 चौरस मीटर क्षेत्रफळापैकी 44 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड रिक्रिएशन ग्राऊंड आणि टेक्सटाईल म्युझियमसाठी राखीव ठेवला आहे. या राखीव ठेवलेल्या भूखंडावर पालिका टेक्सटाईल म्युझियम उभारणार आहे. 2007 पासून हा महत्वाकांक्षी प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. हे म्युझियम साकारताना विद्यमान पुरातन वास्तूची दुरूस्ती करून तीचे वैभव कायम ठेवण्यात येणार आहे. शिल्पकला, कुंभारकाम, चित्रकला, आणि अन्य कला क्षेत्रातील मुलांना अनुभव प्राप्त करण्याच्या दृष्टीने हे म्युझियम आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. या मिलमध्ये असलेल्या जलाशयाच्या भोवतालचा भाग विकसित करण्यात येणार असून, तेथे वेगवेगळ्या प्रकारची शोभिवंत झाडे, फुलझाडे आणि हिरवळ लावण्यात येणार आहे. एवढेच नाही तर नागरिकांना चालण्यासाठी मिलच्या आवारातील मोकळ्या जागेत लादीकरण करून पदपथ तयार करण्यात येणार आहेत. त्याशिवाय मोठे मनोरंजन मैदानही उपलब्ध होणार असल्यामुळे काळाचौकी, लालबाग या भागातील नागरिकांनाच नाही तर देशी-विदेशी पर्यटकांसाठीही हे म्युझियम पर्यटन स्थळ होणार आहे. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या म्युझियममध्ये मिलमध्ये विविध कामासाठी वापरण्यात आलेली यंत्रे, जुने फॅब्रिक, टेक्सटाईल नमुने, प्रमुख मेड इन इंडिया ब्रॅण्डचा पारंपारिक पोषाख, कपडे यांचे किरकोळ विक्री केंद्र आणि तयार कपड्यांचा विभाग उघडण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले. टेक्सटाईल म्युझियम प्रकल्पाचे संकल्पचित्रे आणि प्रकल्प सल्लागार म्हणून जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेची नियुक्ती करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान या म्युझियमची संकल्पचित्रे डिसेंबर 2017 पूर्वी पूर्ण करण्यात येणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कामाचा शुभारंभ 2018 मध्ये होईल,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा