कोकण रेल्वेने (konkan railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका क्लिकवर रेल्वेगाड्यांची सद्यस्थिती समजणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 'केआर मिरर' केआरसीएल मोबाइल ॲप सुरू केले आहे. मराठीसह चार भाषांत हे ॲप कार्यान्वित आहे.
नव्याने डिझाइन केलेल्या मोबाइल ॲपमध्ये वापरातील सुलभता, प्रवेश योग्यता आणि वैयक्तिकरणावर भर देण्यात आला आहे. 'केआर मिरर' मोबाइल ॲपमध्ये प्रवाशांना आवश्यक प्रवासाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
बहुभाषिक ॲप असल्याने याद्वारे प्रवासादरम्यान सुरक्षा जागरूकता मोहीम राबवणे सहज शक्य होणार आहे. कोकणातील विविध पर्यटनस्थळे आणि ठिकाणे यांची माहिती यामध्ये असल्याने प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे.
ॲपची (app) जोडणी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला देण्यात आली आहे. यामुळे ॲपमधून थेट संकेतस्थळावर पोहोचणे शक्य आहे.
सद्यस्थिती आणि तपशीलवार रेल्वे वेळापत्रक, स्थानकासह रेल्वेगाड्यांच्या केटरिंग सेवांची माहिती, महिला समर्पित सुविधा आणि हेल्पलाइन, प्रवाशांसाठीच्या हेल्पलाइन अशा सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत.
कोकण रेल्वेचा इतिहास, मैलाचे दगड आणि कोकण रेल्वेने केलेली कामे यांचा उल्लेख आहे. केंद्रीय माहिती सूचना प्रणाली केंद्रातून करण्यात येणाऱ्या उद्घोषणा आणि सूचना ॲपमध्ये झळकणार आहेत.
आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, यासह आणि त्वरित-प्रवेश हेल्पलाइन अशी मोबाइल ॲपची निवडक वैशिष्ट्ये आहेत, असे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या (ganeshotsav) काळात मुंबईहून (mumbai) कोकणात जाण्यासाठी जादा, स्पेशल गाड्याही चालवण्यात आल्या होत्या. गणेशोत्सवानंतर दसरा, दिवाळीत, डिसेंबरमध्येही कोकणात जाण्यासाठी मोठी गर्दी असते.
अशा सुट्ट्यांच्या काळात आता रेल्वेकडून खास लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते सावंतवाडी अशी विशेष साप्ताहिक विशेष सेवा सुरू केली जात आहे. 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या काळात ही विशेष साप्ताहिक रेल्वे सेवा देण्यात येणार आहे. या साप्ताहिक रेल्वेच्या आठ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
हेही वाचा