Advertisement

तर मुंबई हगणदारीमुक्त कशी होईल?


तर मुंबई हगणदारीमुक्त कशी होईल?
SHARES

केंद्र सरकारने मुंबईला हगणदारीमुक्त शहर घोषित केलं असलं तरी प्रत्यक्षात झोपडपट्ट्यांमध्ये आजही शौचालयांची कमरता आहे. अनेक शौचालये तोडून ठेवली असून लोकांना आपल्या प्रात:विधी चक्क रस्त्यावर नाही तर उघड्यावर उरकाव्या लागत आहे.

मागील दोन वर्षांपासून ५ हजार शौचालयांच्या तुलनेत दोन हजारच शौचालये बांधली गेली असून आता आणखी २२ हजार शौचालयाची उभारणी केली जाणार आहे. जर दोन वर्षांत दोन हजार शौचालये बांधली जाणार असतील तर मुंबई हगणदारीमुक्त कशी होईल? असा सवाल स्थायी समिती सदस्यांनी व्यक्त केला.


मुदत वाढवण्याचा प्रस्ताव

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्याकरता शौचालयांचं बांधकाम करण्यासाठी मागील दोन वर्षांपूर्वी लॉट १० मधील शौचालयांच्या बांधकामांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मागील दोन वर्षांमध्ये एकूण २ हजार २५३ शौचकुपे बांधण्यात आली आहे. तर ९ विभागांमध्ये १४२० शौचकुपांची काम प्रगतीपथावर आहे. 

परंतु या ९ विभागात नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांची मुदत ३० सप्टेंबरला संपुष्टात येत असल्यानं त्यांची मुदत सहा ते बारा महिन्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे सादर केला होता.


शौचालयांची कामं अपूर्णच

भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी शौचालयांच्या दर्शवल्या जाणाऱ्या आकडेवारीबाबत चिंता व्यक्त करत कुठेच शौचालयांची कामं पूर्ण झालेली नाही. ज्या गतीने ही कामं व्हायला पाहिजे होती तीसुद्धा होत नाही. मुंबईत केवळ ४० टक्के शौचालयांची जोडणी मलनि:सारण वाहिन्यांना जोडलेली आहे. स्वच्छ भारत आणि हगणदारीमुक्त मुंबई म्हटली जात असली तरी दोन वर्षात काहीच झालेलं नाही. त्यामुळे याची श्वेतपत्रिका काढली जावी, अशी मागणी त्यांनी केली.


मग मुंबई हगणदारीमुक्त कशी?

शौचालयांच्या बांधकामासाठी आपण स्वत: आयुक्तांकडे बऱ्याचदा बैठका घेतल्या आहेत. एवढंच नव्हेतर मुख्यमंत्र्यांशीही बैठक घेऊन शौचालयांच्या बांधकामासाठी छोटी छोटी कंत्राटे दिली जावी, अशी मागणी केली होती, असं सपाचे रईस शेख यांनी सांगितलं. जेणेकरून शौचालयांची उभारणी योग्यप्रकारे केली जाईल, असंही त्यांनी मागील पाच वर्षांतील नगरसेवक कारकिर्दीत आपण केवळ ३ शौचालयांची उभारणी करू शकलो. जर अशाप्रकारे शौचालयांची उभारणी होत असेल तर मुंबई हगणदारीमुक्त कशी होईल? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसच्या नगरसेविका कमरजहाँ सिद्दीकी यांनी आपल्या भागात अनेक शौचालये तोडून ठेवली आहेत.


लोकांची गैरसोय

लोकांची गैरसोय होत असून परिणामी नागरिकांना मोकळ्या जागेत प्रात:विधीसाठी बसावं लागत आहे. शौचालयांमुळे नगरसेवक बदनाम होत असल्याची नाराजी शिवसेनेचे संजय घाडी यांनी व्यक्त केली. तर मुंबईत आरसीसीची दुमजली आणि तीन मजली शौचालयांची उभारणी करण्याऐवजी बैठ्यास्वरुपाची शौचालयांची उभारणी करण्याची मागणी माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जैविक शौचालयांची उभारणी किती केली, याची विचारणा केली. हगणदारीमुक्त मुंबईबाबत अधिकाऱ्यांकडून आयुक्तांची दिशाभूल केली जात आहे. अँटॉप हिल परिसरात केवळ दोनच शौचालयांची उभारणी केल्याचं त्यांनी सांगितलं.


हगणदारीतून मुक्तता कधी?

सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी आपण महाराष्ट्र हगणदारीमुक्त करतो, पण मुंबईला हगणदारीमुक्त करू शकत नाही, असं सांगत या शहराला हगणदारीतून मुक्तता कधी मिळेल असा सवाल केला. त्यामुळे याबाबत श्वेतपत्रिका काढली जावी, अशी सूचना केली. मात्र, यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पुढील बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा